रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन दिवसांपासून सुरू आहे. रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकांना (पॅराट्रुप्स) उतरवल्याचा दावा रशियन लष्कराने केला. दोन्ही देशांमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशातच राजधानी किव्हमध्ये एक जोडपं विवाहबद्ध झालंय.
यारीना अरिएवा आणि तिचा जोडीदार श्व्याटोस्लाव फुरसिन यांनी मे महिन्यात युक्रेनची राजधानी किव्ह येथील रेस्टॉरंटच्या टेरेसवर लग्न करण्याची तयारी केली होती. परंतु लग्नाचं सगळं प्लॅनिंग तसंच ठेवत आणि शाही विवाहाचं स्वप्न बाजूला सारत त्यांनी या आठवड्यात एका मठात घाईघाईत लग्न केलंय. नीपर नदीच्या काठी असलेल्या रेस्टॉरंटच्या टेरेसवर लग्नाची स्वन रंगवलेल्या या जोडप्यानं जेव्हा लग्न केलं तेव्हा रशियाकडून हवाई हल्ला सुरू होता. आणि त्या भीतीदायक आवाज आणि वातावरणात फक्त सोबत राहण्यासाठी जीवाची बाजी लावत यारीना आणि श्व्याटोस्लाव फुरसिन यांनी लग्न केलं.
यारीना आणि श्व्याटोस्लाव फुरसिन यांनी ठरलेल्या वेळेच्या आधीच लग्न करून घेण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना त्यांचे भविष्य कसे असेल, याची खात्री नव्हती. गेल्या काही आठवड्यांपासून देशात तणाव निर्माण झाला होता आणि शेवटी त्यांना ज्याची भीती वाटत होती तेच घडले. रशियन सैन्याने आक्रमण केलं आणि राजधानी किव्हसर अनेक मोठ्या शहरांवर अनेक क्षेपणास्त्रांचा मारा सुरू झाला.
किव्ह सिटी कौन्सिलच्या डेप्युटी असलेल्या २१ वर्षीय यारीनाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या २४ वर्षीय फुरसिनशी किव्हच्या सेंट मायकेल मठात लग्न केले. लग्नात हे दोघेही खूप उदास दिसत होते. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, यारीना म्हणाली की, “ते सर्व खूप भीतीदायक होतं. तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या दिवशी तुम्ही हवाई हल्ल्याच्या सायरनचा आवाज ऐकताय, यापेक्षा वाईट काय असू शकतं. लग्न करताना आमचा मृत्यूही होऊ शकला असता, परंतु त्यापूर्वी आम्हा दोघांना सोबत रहायचं होतं, म्हणून आम्ही लग्न केलं. आम्ही आमच्या भूमीसाठी लढत राहू,” असा निर्धारही यावेळी तिने केला.