रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आजचा १४वा दिवस आहे. युक्रेनमध्ये रशियाकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत. रशियाचे आतापर्यंत १२ हजार सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनमधील परिस्थिती सध्या भीषण असून रशियाकडून सातत्याने क्षेपणास्त्रांचा मारा सुरू आहे. युद्धग्रस्त युक्रेनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक व्हिडीओंमध्ये युक्रेनचे नागरिक रशियन सैन्याला सामोरे जात असल्याचं दिसतंय. आता युक्रेनच्या लष्कराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
उद्ध्वस्त झालेल्या रस्त्यावर बॉबी मॅकफेरिनचे ‘डोन्ट वरी, बी हॅप्पी’ हे गाणे युक्रेनियन लष्करी बँड वाजवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये लष्करी गणवेशातील पाच ब्रास प्लेयर ओडेसा ऑपेरा आणि बॅलेट थिएटरचे रक्षण करताना आणि ‘डोन्ट वरी, बी हॅप्पी’ वाजवत असताना दिसत आहेत. बॅण्ड वाजत असताना त्यांच्या पाठिमागे युक्रेनियन ध्वज फडकत आहेत. व्हिडीओत काही अंतरावर ओडेसा ऑपेरा आणि बॅलेट थिएटर देखील दिसतंय.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या बँडचं कौतुक केलंय. तसेच युक्रेनियन नागरिकांच्या धाडसाचं देखील कौतुक केलं. ‘युक्रेनियन तुमचं धैर्य आणि हिंमत आश्चर्यचकित करणारी आहे, तुम्हाला खूप प्रेम आणि या युद्धातून सावरण्याचं बळ मिळो,’ असं एका युजरने म्हटलंय.