सोशल मीडियाचा वापर हा आता जवळजवळ प्रत्येक वयोगटातील मंडळी करत आहे. त्याच्यावर फोटो-व्हिडीओ शेअर करणे आणि पाहणे यांसारख्या गोष्टी सर्व मंडळी करत असतात. मात्र, कधी कधी काही ‘जेन-झी’ [Gen-Z] अकाउंट्स शब्दांची फोड करून किंवा अर्धवट शब्दप्रयोग करून जी एक प्रकारची विचित्र भाषा बोलत असतात, ते समजण्यासाठी वेगळी डिक्शनरी/शब्दकोश घ्यावा की काय असा प्रश अनेकांना पडत असतो. तुम्हीही सध्या असे काही विशेष शब्द नक्कीच ऐकले असतील. गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर डेल्युलू [Delelu] सोलुलू [solulu] अशा प्रकारचे शब्द फारच जास्त ट्रेंडमध्ये आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता हे इतके विचित्र शब्द आहेत, पण त्यांचा नेमका अर्थ काय असा तुम्हाला प्रश्न पडणे सहाजिकच आहे. तर, याला ‘जेन-झी लिंगो’ असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर तरुण पिढीने झटपट वापरासाठी बनवलेले काही शब्द असे म्हणू शकतो. हे लिंगो अतिशय वेगाने वाढत आणि बदलत असतात. पण, तुम्हाला जर या भाषेशी ओळख करून घ्यायची असेल, तर हे काही शब्द आणि त्यांचे अर्थ नक्कीच तुमची मदत करतील.

शब्दांचे अर्थ समजून घेण्याआधी ‘जेन-झी’ म्हणजे नेमकं काय हे आधी समजून घ्या.

जेन-झी म्हणजे जनरेशन झेड. साधारण १९९६-९७ ते २०१२-१५ या दरम्यान ज्यांचा जन्म झाला असेल त्यांच्या पिढीला, जनरेशन झेड किंवा ‘जेन-झी’ असे म्हटले जाते; असे टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते.

जेन-झी लिंगो आणि त्याचे अर्थ

१. Delulu [डेल्युलू]

डेल्युलू हा इंग्रजी शब्द डिल्युजन [भ्रम] यावरून बनवला गेला आहे. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्याबद्दल, जीवनाबद्दल किंवा कोणत्याही घटनेबद्दल अवास्तविक विचार करत असतो तेव्हा त्याला डिल्युजन असे म्हणतात. तरुण पिढीमध्ये ‘डिल्युजन इज द सोल्युशन’ अशी म्हण सध्या चांगलीच चर्चेत आहे. या म्हणीचा अर्थ सांगायचा झाल्यास, ‘अवास्तविकता किंवा भ्रम हाच एकमेव उपाय आहे’ असा काहीसा होऊ शकतो.

२. एनपीसी [NPC]

या शब्दाचा अर्थ ‘नॉन प्लेअर कॅरेक्टर’ असा होतो. कोणत्याही प्रकारचा विचार न करता आंधळेपणाने एखाद्याचे अनुकरण करणाऱ्या व्यक्तीसाठी या शब्दाचा वापर केला जातो.

हेही वाचा : ‘मोये मोये’ गाण्याचा ट्रेंड तर माहित आहे; पण त्याचा नेमका अर्थ काय ते पाहा…

३. बशिंग [Bussin]

एखादा पदार्थ, वस्तू, संगीत, गाणे किंवा कोणत्याही आवडलेल्या गोष्टींचे कौतुक करण्यासाठी Bussin हा शब्द वापरला जातो. जसे मराठीमध्ये आपण मस्त, कमाल, जबरदस्त, भारी, अप्रतिम यांसारख्या शब्दांचा वापर करतो; अगदी त्याच पद्धतीने Bussin या शब्दाचा वापर जेन-झी मंडळी करत असते.

४. ड्राय डेटिंग [Dry Dating]

ड्राय डेटिंग या शब्दामधील ड्राय हा शब्द मद्यपान न करण्याबद्दल सूचित करतो. एखाद्या व्यक्तीला डेटसाठी भेटायला गेल्यानंतर मद्यपानाचे सेवन न करणे, म्हणजेच ड्राय डेटिंग होय. अशा पद्धतीची डेटिंग संस्कृती पाश्चिमात्य देशांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. एखादी व्यक्ती जर तुम्हाला पहिल्यांदाच भेटणार असेल तर तेव्हा, केवळ त्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी ड्राय डेटिंग केले जाते.

५. टीएफडब्ल्यू [TFW]

‘दॅट फिलिंग व्हेन’ या वाक्याचे संक्षिप्त रूप म्हणजे टीएफडब्ल्यू. याचा वापर खासकरून एखादा प्रसंग आठवून सांगताना किंवा एखादी भावना मांडताना केला जातो. टीएफडब्ल्यू हा शब्द विशेषतः मिम्स [memes] शेअर करताना केला जातो.

६. टच ग्रास [Touch Grass]

भरपूरवेळ फोन स्क्रीनसमोर घालवल्यानंतर त्यातून बाहेर येणासाठी, मार्मिकरित्या ‘टच ग्रास’ या शब्दाचा वापर केला जातो. आभासी जगातून किंवा तुमच्या ‘डेल्युयू’मधून बाहेर येणाची सूचना या ‘टच ग्रास’ शब्दांद्वारे देता येते.

७. विंटर कोटिंग [Winter Coating]

हिवाळा आलेला आहे आणि विंटर कोटिंग हा शब्द ऐकून कदाचित तुम्हाला थंडीसाठी गरम कोट घालण्याबद्दल चर्चा चालू आहे असे वाटत असेल. परंतु, तसे अजिबात नाहीये. विंटर कोटिंग याचा जेन-झीच्या शब्दकोशात फारच वेगळा अर्थ आहे. आपल्या जुन्या साथीदारासोबत [एक्स-पार्टनर] पुन्हा एकत्र येणे, असा या शब्दाचा अर्थ होतो.

हेही वाचा : Video : ‘-१६ तापमानात’ भारतीय सैनिकासोबत केले पुशअप चॅलेंज! पाहिला का हा Viral व्हिडीओ?

इंडिया टुडेच्या एका लेखातील माहितीनुसार, हे आहेत जेन-झीच्या शब्दकोशातील काही शब्द आणि त्याचे अर्थ. त्यामुळे, पुढच्यावेळेस सोशल मीडियावर यातील कोणताही शब्द दिसल्यास त्याचा अर्थ नक्कीच तुमच्या लक्षात येऊन तुम्हाला अजिबात ‘फोमो’ [FOMO – फियर ऑफ मिसिंग आउट] वाटणार नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Understand the meaning of these seven gen z lingo words that are all over social media platforms dha