Japan Man 4 Wives, 2 Girlfriend: जपानच्या ३६ वर्षीय व्यक्तीची सध्या जगभरात चर्चा आहे. जिथे एक त्रिकोणी कुटुंब हाताळताना नाकी नऊ येतात. तिथं हा पठ्ठ्या तीन बायका आणि दोन प्रेयसीबरोबर एकाच घरात राहतो. इतर लोकांन जिथं घरचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न भेडसावतो, पण या पठ्ठ्याला खर्चाचं काही टेन्शन नाही. कारण त्याने मागच्या १० वर्षांपासून कामच केलेलं नाही. कारण घरखर्चाची जबाबदारी तीन बायका आणि दोन गर्लफ्रेंड बघतात. रयुता वतनबे असे या व्यक्तीचे नाव असून तो स्वतः ५४ मुलांचा बाप बनू इच्छितो. रयुता हा स्वतः गृहिणीप्रमाणे जीवन जगतोय. तो घरातलं सर्व काम करतो, जेवण बनवतो, झाडलोट करतो आणि मुलांचा सांभाळ करतो. त्याच्या घराचा महिन्याचा खर्च पाच लाख रुपये असून त्याच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड मिळून खर्च भागवतात.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने जपानच्या शुएशा ऑनलाईन वृत्तसंस्थेच्या हवाल्याने सदर बातमी दिली आहे. रयुता सध्या १० मुलांचा बाप आहे. जपानमध्ये एकापेक्षा अधिक पत्नी करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे रयुताने कोणत्याही पत्नीशी अधिकृतपणे लग्न केलेले नाही. त्यांनी आपापसातील संमतीनुसार जबाबदाऱ्या वाटून घेऊन दीर्घकालीन सहवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रयुताने नुकतेच चौथ्या पत्नीशीही संबंध प्रस्थापित केले आहेत. मात्र ही २४ वर्षांची पत्नी त्यांच्याबरोबर राहत नाही. ती वेगळी राहते.

रयुता वतनबेचा कौटुंबिक गोतावळा.

जपानमधील एका टीव्ही शोमध्ये बोलताना रयुता म्हणाला की, मला महिलांवर प्रेम करणं आवडतं. जोपर्यंत आमचे एकमेकांवर समान प्रेम आहे, तोपर्यंत काहीच अडचण येत नाही. तसेच त्याने त्याच्या खासगी लैंगिक आयुष्याबद्दलही माहिती दिली. सध्या पाच जणींशी संसार करत असतानाच कोणतीही महिला एकमेकींवर जळत नाही. त्या सर्वजणी एकमेकींशी मैत्रीणींसारख्या राहतात. त्याच्या प्रत्येक पत्नी आणि प्रेयसीसाठी स्वतंत्र खोली आहे आणि तो रोज एका पत्नी, प्रेयसीसह रात्र घालवतो, असेही रयुता म्हणाला.

रयुता म्हणाला की, मला ५४ मुलं व्हावीत, अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून माझ्या नावावर विश्वविक्रम नोंदविला जाईल. यासाठी मी अजूनही नवी पत्नी शोधत आहे.

रयुता वतनबेला अशी अजब कल्पना का सुचली आणि इतक्या महिलांबरोबर राहण्याचा निर्णय त्याने का घेतला? याबद्दल त्याला विचारले असता रयुता म्हणाला की, याची सुरुवात सहा वर्षांपूर्वी झाली. त्याच्या एका प्रेयसीने त्याला दगा दिल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. त्यानंतर त्याने डेटिंग अॅप्सवरून अनेक महिलांच्या गाठीभेटी घेतल्या आणि एकत्र कुटुंबासारखे राहण्यास त्यांचे मन वळविले.