2010 साली दक्षिण फ्रान्सच्या एका शहरात राहणाऱ्या मादाम डे फ्लोरियन या ९१ वर्षांच्या महिलेचं निधन झालं. तिच्या नातेवाईकांनी तिला शोकाकुल वातावरणात निरोप दिला आणि दु:खी मनाने का होईना आपल्या आयुष्यात ते पुन्हा व्यस्त झाले.
काही दिवसांनी फ्लोरियन कुटुंबीयांना एक विचित्र मेसेज मिळाला. मादाम फ्लोरियन यांच्या मालकीचं पॅरिसमध्ये एक घर असून आता त्यांचं निधन झाल्याने आता त्या घराचा ताबा तुम्ही घ्यावा असं लिहिलेलं ते पत्र होतं. त्यानुसार फ्लोरियन कुटुंबाने या घराच्या चाव्या मिळवल्या. पण ते घर उघडताच त्यांचे डोळे फिरले.
हे घर उघडताच १०० वर्षांपूर्वीची फ्रेंच संस्कृतीच्या सौंदर्याने नखशिखांत भरलेला खजिना फ्लोरियन कुटुंबापुढे खुला झाला. मादाम फ्लोरियनच्या मालकीचं हे घर म्हणजे फ्रान्सच्या बेल एपाॅक पध्दतीने केलेल्या सजावटीचं एक नितांतसुंदर उदाहरण होतं. फ्रेंच खिडक्यांना सोन्याचा वर्ख दिलेले पडदे लावलेले होते. अप्रतिम नक्षीकाम केलेल्या ड्रेसिंग टेबलवर तेवढेच सुंदर हेअरब्रश, परफ्युमच्या बाटल्या अाणि अर्ध्या जळालेल्या मेणबत्त्या होत्या. सगळीकडे शंभर वर्षांपूर्वीची पुस्तकं , वर्तमानपत्रं पडली होती. जमिनीवर उंची गालिचे होते. मिकी माऊसचा शंभर वर्षांपूर्वीचं एक स्टफ टाॅयसुध्दा या घरात होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घरात साठलेली धूळ सोडली तर हे सुंदर घर कोणाची तरी वाट पाहत थांबलं असावं एवढी सहजता या घराच्या सौंदर्यात जाणवत होती. आणि हे फोटो फ्लोरियन कुटुंबाने घराची पुन्हा एकदा सजावट केल्यानंतरचे नाहीयेत. तर गेल्या ७० वर्षांहून जास्त काळ हे घर तंतोतंत अशाच अवस्थेत बंद राहिलं होतं !
मादाम डे फ्लोरियनच्या कुटुंबाला १९४२ साली हे घर सोडावं लागलं होतं. दुसऱ्या महायुध्दादरम्यानच्या या काळात जर्मनीचे ग्रह उच्चीचे होते. हिटलरच्या फौजा युरोपभर आपला अंमल यशस्वीपणे प्रस्थापित करत होत्या. फ्रान्समध्येच फ्रेंच सैन्याची पीछेहाट होत होती. पॅरिसवर जर्मनी ताबा मिळवणार अशी चिन्हं दिसू लागली आणि मादाम डे फ्लोरियनच्या कुटुंबाने पॅरिसमधलं आपलं सुंदर घर सोडत फ्रान्सच्या दक्षिण भागात आश्रय घेतला. सुदैवाने या घराची नासधूस कोणी केली नाही. मादाम डे फ्लोरियननी सुध्दा कदाचित युध्दाच्या कटू आठवणी विसरण्यासाठी या घराचा पुन्हा ताबा घेतला नाही. पण फ्रेंच कलासक्तीचं प्रतीक बनलेलं हे घर जगभर चर्चेचा विषय झालंय.