राजकारणात सत्ताधारी विरूद्ध विरोधी पक्ष अशा कुरघोड्या काही नवीन नाहीत. मागील काही काळात देशात व राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यांमुळे अगदी सामान्य माणूस सुद्धा सर्व नेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तर हे आणखीनच सोपे झाले आहे. असाच एक व्हिडीओ सध्या ऑनलाईन व्हायरल झालेला दिसून येत आहे. यात पंतप्रधानांवर टीका केली जात आहे. आश्चर्य म्हणजे टीका करणारे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आहेत. यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यातील मोदींच्या भाषणानंतर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
आझादीच्या अमृत महोत्सवात मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना महागाईवर एकही विधान केले नाही म्हणत विरोधकांनी निषेध केला होता. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये राजनाथ सिंह हे सुद्धा याच मुद्द्यावरून बोलताना दिसत आहेत. “पंतप्रधान ६ महिन्यात महागाई कमी करण्याचे आश्वासन मागील ९ वर्षांपासून देत आहेत मात्र अजूनही महागाई कमी झालेली नाही याचा अर्थ असा की पंतप्रधानच देशातील जनतेला खोटे आश्वासन देत आहेत,” अशा शब्दात संरक्षण मंत्र्यांनी टीका केली आहे.
यावरून कोणतेही अंदाज बांधण्याच्या आधी यामागचे तथ्य जाणून घ्या, खरंतर या व्हिडीओ मध्ये राजनाथ सिंह हे स्वतः बोलत असले तरी हा आताचा व्हिडीओ नाही. पीआयबीने स्वतः याविषयी माहिती देत सांगितले की हा व्हिडीओ २०१३ चा असून त्यावेळेस राजनाथ सिंह हे भाजप अध्यक्ष होते व तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका करताना एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले होते.
व्हायरल व्हिडीओचे फॅक्ट चेक
हा जुना व्हिडीओ चुकीचा संदर्भ देऊन सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला गेला आहे. यातील राजनाथ सिंह यांचे विधान हे पंतप्रधान मोदी किंवा भाजप सरकारवर टीका करणारे नाही अशीही माहिती पीआयबी कडून देण्यात आली आहे. दरम्यान व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर कमेंट करून हा खोटा व्हिडीओ असला तरी आताही लागू होतो अशा पद्धतीची प्रतिकिया दिलेली आहे.