यावर्षात काही लग्नाची चर्चा पूर्ण देशभर झाली. मग ते जनार्दन रेड्डींच्या मुलींचे ५०० कोटींचे लग्न असो किंवा युपीएसीच्या परिक्षेतील टॉपर्स विवाहबंधनात अडकणार याची चर्चा असो. या लग्नसोहळ्यावर सर्वाधिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्यात. तर नोटाबंदीच्या निर्णयानंतर असेही काही जोडपे होते ज्यांनी लोकांसमोर आदर्श घालून दिला. पैश्यांची उधळपट्टी न करता या जोडप्यांनी ५०० आणि १००० रुपये खर्चून आपला विवाह सोहळा पार पाडला त्यामुळे एक नवा आदर्श त्यांनी समाजापुढे घालून दिला. तर नाझरीन फजल या लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिकलेल्या तरुणीने अरेंज्ड मॅरेजकडे बघण्याचा संपूर्णदृष्टीकोनच बदलून टाकला.
५०० कोटींचा विवाह सोहळा
नोटांबदीच्या निर्णयानंतर देशभरात चलनकल्लोळ होता. कोणाकडेही पैसे उपलब्ध नव्हते. अशावेळी अवैधरित्या खाणकाम केल्याप्रकरणी साडे तीन वर्षे तरुंगवास भोगलेले भाजपाचे माजी मंत्री जर्नादन रेड्डी यांनी आपल्या मुलीच्या लग्नावर चक्क ५०० कोटी रुपये उधळले होते. पाच दिवस चाललेल्या या विवाह सोहळ्यासाठी रेड्डीने आलीशान हॉटेल्स आरक्षित केले होते. इतकेच नाही तर प्राचीन मंदिरांचा भव्य दिव्य मंडपही उभारला होता. ३० हजारांहूनही अधिक लोकांनी या लग्नाला उपस्थिती लावली होती. या लग्नसोहळ्यानंतर जनार्दन रेड्डी चांगलेच अडचणीत सापडले होते. तर सोशल मीडिया आणि अन्य माध्यमातून या विवाह सोहळ्यावर सडकून टिका करण्यात आली होती.
युपीएससी परीक्षेतील ‘टॉपर्स’ची प्रेमकाहाणी
युपीएससी परिक्षेत पहिली आलेली टीना दाबी ही याच परिक्षेत दुसरा क्रमांक पटकावलेल्या अतहर आमिर उल शफी खान याच्या प्रेमात पडली. तिने आपली प्रेमकहाणी सोशल मीडियावर अपलोड केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची देशभर चर्चा झाली. या दोघांनीही आपण लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे जाहिर केले. पण हे दोन्ही प्रेमी युगुल नंतर वादात सापडले. हिंदू महासभेने तर या लग्नावर आपला आक्षेप असल्याचे जाहिर केले होते.
लग्नात पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा ९० गरीब कुटुंबियांना घरांचे वाटप
एका दिवसाच्या विवाह सोहळ्यावर लाखो, कोट्यवधी रक्कम खर्च करण्यापेक्षा हा सारा खर्च टाळून औरंगाबादमधल्या श्रेया मुनोत या नववधुने ९० गरीब कुटुंबियांना घरांचे वाटप केले. औरंगाबादमधल्या मनोज मुनोत यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी ६० ते ७० लाख रुपये खर्चण्याचे ठरवले होते. मात्र एक दिवसाच्या उधळपट्टीपेक्षा त्यांने ही रक्कम चांगल्या कारणासाठी वापरण्याचे ठरवले. आपल्या लग्नादिवशी या नववधुने गरिबांना घराचे वाटप केले. त्यामुळे सगळ्यांनी त्यांच्या या चांगल्या कामाची दखल घेतली.
अरेंज्ड मॅरेजकडे पाहण्याचा तिने बदलला दृष्टीकोन
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकलेल्या नाझरीन फझलने अरेंज्ड मॅरेज’कडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला. जग पुढे चालले आहे महिला विविध क्षेत्रात कार्यरत होत आहेत अशात चूल आणि मुलच्या चौकटीत अडकलेल्या भारतीय समाजाला तिने एक वेगळा दृष्टीकोन दिला. अरेंज्ड मॅरेज कसे असावे याबद्दल तिने सोशल मीडियावर आपला अनुभव मांडला आणि नक्कीच तिच्या या विचारांचे अनेकांनी स्वागत केले.
नाईलाजाने ५०० रुपयांत शुभमंगल सावधान
नोटांबदीमुळे गुजरातमधल्या सुरत येथे राहणा-या दक्षा आणि भरत परमार या जोडप्याला फक्त ५०० रुपयांत हा विवाह सोहळा आटोपावा लागला. त्यांच्या लग्नाची तारिख आधिच ठरली होती. या दोघांच्याही कुटुंबियांना अगदी धुमधडाक्यात विवाह सोहळा साजरा करायचा होता. पण, ऐन वेळी नोटाबंदीच्या निर्णयामुळे त्यांच्या सगळ्या आशा आकांक्षावर पाणी फेरले. त्यामुळे फक्त जवळच्या पाहुण्यांना बोलावून चहा पाण्यावरच त्यांनी आपला विवाह सोहळा साजरा केला.
आयएसआय जोडप्याचा ५०० रुपयांचा विवाह सोहळा
नोटांबदीनंतर कर्नाटकमधल्या विजयवाडा येथील आयएएस जोडप्याने देखील फक्त ५०० रुपयांमध्ये आपला विवाह सोहळा ओटोपला. अनिष विशिष्ठ हे आयएएस ऑफिसर असून त्यांचा सलोनी सैधाना हिच्याशी २८ नोव्हेंबरला विवाह झाला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्यांना लग्नावर फार उधळपट्टी करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी कोर्टात जाऊन लग्न केले. यासाठी कोर्टाची फक्त पाचशे रुपये फी भरून त्यांनी आपला विवाह सोहळा पार पाडला. त्यांच्याजवळचे काही नातेवाईक या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. इतकेच नाही तर विवाह सोहळा झाल्यानंतर ते दोन दिवसांत आपल्या कार्यालयात दाखल देखील झाले होते.
नवरदेवाविना ऑनलाइन विवाह सोहळा
स्वत:च्या लग्नासाठी सुट्टी मिळेना त्यामुळे बिचा-या वधुला ऑनलाइन विवाह करावा लागला त्यामुळे या लग्नाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत खिल्ली उडवली गेली. केरळमधल्या कोल्लम जिल्ह्यात हा विवाह सोहळा पार पडला होता. कामानिमित्त सुट्टी मिळत नसल्याने हा नवरदेव दुबईतच थांबला त्यामुळे त्याच्यावतीने नवरदेवाच्या बहिणीने सा-या विधी पार पाडल्या.
घरात शौचालय नसल्याने तिने विवाह मोडला
कानपूरमधल्या २५ वर्षांच्या वधूने नव-याच्या घरी शौचालय नसल्याने आपले लग्न मोडले होते. पण नंतर नव-या मुलाकडून आपली शौचालय बांधण्याची अट पूर्ण करून घेतल्यानंतरच या तरूणीने लग्न केले होते.