माजी सैनिक असलेल्या संतोष कश्यप यांची लग्न पत्रिका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. संतोष यांनी आपल्या लग्नपत्रिकेत एक सूचना दिली आहे आणि याच सूचनेमुळे ही पत्रिका व्हायरल झाली आहे.
माजी सैनिक संतोष यांचा बुधवारी विवाह सोहळा पार पडला. त्यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगली गाजली. ‘लग्नात दारू आणि गोळीबारावर पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे ज्यांना मद्यपान करायचे असेल किंवा आनंदाच्या भरात गोळीबार करायचा असेल त्यांनी लग्नाला नाही आले तरी चालेल.’ अशी सूचना त्यांनी आपल्या लग्नपत्रिकेवर छापली आहे. संतोष हे वाजिदपुर या गावाचे निवासी आहे. आतापर्यंत त्यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘कश्यप जागृती चेतना’ यासारख्या अनेक जगजागृती मोहिम राबवल्या आहेत. अनेक लग्नात दारू पिऊन गोळीबार करण्याचा जणू चुकीचा पायंडा पडला आहे. पण या गोळीबारामुळे काही जण जखमी तरी होतात किंवा त्यांना जीव तरी गमवावा लागतो. उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, मध्यप्रदेश यासारख्या ठिकाणी लग्नातील गोळीबारामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात तर नवरदेवाचा देखील गोळी लागून मृत्यू झाला आहे. असा प्रकार आपल्या लग्नात होऊ नये याची खबरदारी कश्यप यांनी घेतली आहे. आणि तशा सूचनाच त्यांनी आपल्या पत्रिकेत दिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्न पत्रिकेची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
गेल्याच आठवड्यात पंजाबमध्ये मद्यधूंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी स्टेजवर नृत्य करणा-या तरुणींसोबत नाचू दिले नाही म्हणून त्यातील एका तरुणीची हत्या केली होती. भटिंडामध्ये लग्न सोहळ्यानिमित्त नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. वरासोबत आलेली मित्रमंडळी मद्यधूंद अवस्थेत होती. यातील काही जणांना स्टेजवर नाचणा-या मुलींसोबत नाचायचे होते. पण त्यांना थांबवण्यात आले होते. यामुळे त्या तरुणांचा पारा चढला होता. संतापाच्या भरात एका तरुणाने स्टेजच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी स्टेजवर नाचणा-या कुलविंदर कौर या तरुणीच्या डोक्यात लागली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.