शिक्षण हे प्रत्येक मुलाच्या उज्वल भविष्यासाठी खूप महत्वाचे आणि गरजेचे आहे. कारण आता शिक्षण घेणारीच पिढीच भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करत असते. आजच्या काळात लोकांनाही शिक्षणाचे महत्व कळत आहे. यामुळे आई-वडिल आपल्या मुलांना शिकवण्यासाठी खूप कष्ठ घेतात. पण काळानुसार शिक्षणही दिवसेंदिवस महाग होत आहे. यामुळे पालकही मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी एक-एक रुपया वाचवून काटकसरीने घर चालवावे लागते. पण काही शाळा अशा आहेत ज्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यात मुलांना कमीत कमी पैशात चांगले शिक्षण देण्यासाठी झगडत आहेत. जेणेकरुन मूल चांगले शिक्षण घेऊन भविष्यात पुढे मोठे पाऊल टाकू शकले. पण सध्या सोशल मीडियावर अशी एक शाळा चर्चेचा विषय बनली आहे, जी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून फी नाही तर चक्क प्लास्टिकच्या बाटल्या घेत आहे. त्यामुळे ही शाळा नेमकी कुठे आहे आणि या शाळाचा उपक्रम नेमका काय आहे जाणून घेऊन…
शिक्षणाच्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून प्लास्टिकच्या बाटल्या घेणारी ही अनोखी शाळा आसाममध्ये आहे. आसामच्या गुवाहाटी स्थित या शाळेने असे अनेक स्तुत्य उपक्रम राबवले जे आता इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहे. विशेष म्हणजे ही शाळा विद्यार्थ्यांकडून फी म्हणून पैसे घेत नाही, तर रिकाम्या बाटल्या जमा जमा करते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षणासाठी फी नाही तर चक्क प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करुन द्यावा लागतात.
आश्चर्यकारक बाब म्हणजे, यामुळे या शाळेत शिकणारे विद्यार्थी अभ्यासासोबतच पैसेही कमवू शकतात. ग्रामीण भागातील शंभरहून अधिक मुलं या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात, असे सांगितले जात आहे. या अनोख्या शाळेचा व्हिडीओ ontheground.with.saiandplanetindia_ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.
या शाळेच्या फीबद्दल बोलायचे झाले तर, दर आठवड्याला या शाळेतील विद्यार्थी २५ रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करुन आणतात. परिसरातील घाणीचे ढिगारे आणि शिक्षणाचा अभाव पाहून एका दाम्पत्याला अशाप्रकारे शाळा उघडण्यची ही कल्पना सुचली. या माध्यमातून मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि समाजासाठी काहीतरी चांगले करता यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी या शाळेची सुरुवात केली. इथे अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांना सुतारकाम, बागकाम आणि इतर कला शिकवल्या जात आहेत. तसेच प्लास्टिकच्या बाटल्यांपासून अनेक प्रकारच्या वस्तू कशा बनवायच्या याचेही शिक्षण दिले जात आहे.