Ayodhya Digital Rangoli Video: अयोध्येतील ऐतिहासिक भव्य राम मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर हे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर दररोज लाखो लोक दर्शनासाठी अयोध्येत दाखल होत आहेत. अशात अयोध्येतल्या रस्त्यांवर सध्या कधीही न पाहिलेले असे अनोखे तितकेच सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. हे दृश्य पाहून अयोध्येत येणाऱ्या भाविकांनाही आनंद होत आहे.
अयोध्येतील रस्ते चक्क डिजिटल रांगोळ्यांनी सजवले आहेत. इतकेच नाही, तर रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबांनाही वेगवेगळ्या सुंदर डिझाइन्समध्ये रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे; जे मनमोहक दृश्य पाहून रामभक्तांना खूप आनंद होत आहे. अनेक रामभक्तांना या रांगोळ्यांबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.
रस्त्यावर काही अंतर सोडून दिसणाऱ्या रंगीबेरंगी दिव्यांची रांगोळ्या अयोध्येत येणाऱ्यांसाठी एक आकर्षणाचा भाग बनत आहे. त्यात हनुमानगढी मंदिराच्या प्रवेशद्वारावर काढलेली ही डिजिटल रांगोळी विशेष आकर्षक आहे. अयोध्येत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या डिजिटल रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. शहर सजवणे आणि रामलल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे उत्तम स्वागत करणे हा त्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
संपूर्ण रस्त्यावरील या डिजिटल रांगोळ्या दिसायला अतिशय सुंदर असून, त्यामुळे अयोध्येचे वातावरण आणखीनच भक्तिमय झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हा उपक्रम स्तुत्य असून, त्यामुळे त्यांचा उत्साह आणखी वाढल्याचे रामभक्तांचे म्हणणे आहे.
७०० रुपयांना थार मागणारा चिमुकला थेट पोहचला कारखान्यात; आनंद महिंद्रांनी Video केला शेअर, म्हणाले…
भव्य मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर आता लाखो भाविक पायी चालत अयोध्येत पोहोचत आहेत. आतापर्यंत २२ लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी आले आहेत. या भाविकांना राम मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर सायंकाळच्या वेळी या सुंदर डिजिटल रांगोळ्या पाहता येणार आहेत.