राजस्थानच्या टोंक जिल्ह्यामध्ये एका तरुणाने दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. या सुशिक्षित तरुणाने लग्नासाठी ठेवलेली अट मान्य केल्याने त्या तिघांनी लग्न केले. दोन्ही घरातील वयस्कर मंडळींच्या मर्जीने हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. सोशल मीडियावर या लग्नाची मोठी चर्चा पाहायला मिळते. घरातील मोठ्यांनी, गावातल्या लोकांनी या लग्नाला परवानगी कशी दिली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर काहीजण ‘त्या शिकलेल्या तरुणाला लग्नाची अशी काय अट वरपक्षाने घातली की तो लग्नासाठी तयार झाला’ असे म्हणत आहेत.
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या सुशिक्षित तरुणाचे नाव हरिओम मीणा असे आहे. राजस्थानमधील टोंक जिल्ह्यामध्ये तो राहतो. त्याच्या लग्नाच्या बातमीसह लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेचा फोटो सुद्धा व्हायरल होत आहे. हरिओमचे संपूर्ण कुटूंब, त्याचे मित्र आणि गावातील सर्व गावकरी त्याच्या लग्नाला हजर असल्याचे म्हटले जात आहे. लग्नाबाबतची माहिती बऱ्याच लोकांपर्यंत पोहचल्यानंतर हरिओमने माध्यमांना दोन बहिणींशी लग्न करण्याचे कारण सांगितले.
नवरीने ठेवली अनोखी लग्नाची अट
हरिओम म्हणाला, लग्नासाठी मुलगी पाहायला म्हणून मी सहपरिवार बाबूलाल मीणा यांच्या घरी गेलो होतो. लग्नाची बोलणी करताना तेथे बाबूलाल यांची मोठी मुलगी कांता हजर होती. कांताच्या सोबतीला मानसिकरित्या कमजोर असलेली तिची धाकटी बहीण होती. कांताने माझ्यासमोर लग्नासाठी ‘मी अशा तरुणाशी लग्न करेन, जो माझ्याबरोबर माझ्या लहान बहिणीशीही लग्न करेल’ अशी अट घातली. धाकट्या बहिणीबद्दलचं कांताचं प्रेम, जिव्हाळा पाहून मी तिची अट मान्य केली आणि आमचं लग्न झालं.
हरिओम सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. तर त्याची पत्नी कांता ही बीएड ग्रॅज्युएट आहे. तर कांताची गतिमंद बहीण ही आठवीपर्यंत शिकली आहे. लग्नाच्या धाडसी निर्णयामुळे हरिओमचे खूप कौतुक होत आहे.