मतभेद, आर्थिक अडचणी किंवा ऐन वेळी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे एखादं लग्न मोडल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एक लग्न एका विचित्र कारणामुळे ऐनवेळी मोडलं. नवऱ्या मुलाला टक्कल असल्याचं लक्षात आल्याने मुलीने लग्न करण्यास नकार दिल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यामध्ये घडलाय.
लग्न मंडपामध्ये लग्नाचे अर्ध्याहून अधिक विधी पूर्ण झाल्यानंतर नवऱ्या मुलीला नवरदेवाला टक्कल असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या मुलीने लग्नमंडपातच लग्नाला नकार दिला. टक्कल असणाऱ्या मुलासोबत आपण लग्न करणार नाही अशी भूमिका मुलीने घेतली अन् हे लग्न अर्ध्यातच सोडून ती निघून गेली असं आयएएनएस या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात म्हटलंय.
झालं असं की लग्नाचे अर्ध्याहून अधिक विधी आदल्या दिवशी पूर्ण झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नमंडपात प्रवेश करताना नवऱ्या मुलाला चक्कर आली. नवरा मुलगा चक्कर येऊन खाली पडला अन् त्याच्या डोक्यावरील वीग निघाला. त्यानंतर नवरीकडच्यांना नवरदेवाला टक्कल असल्याचं समजलं. नवरदेवाला टक्कल असल्याचं नवऱ्याकडील मंडळींनी नवरीकडच्यांपासून लपवून ठेवलं होतं. मात्र आपला होणारा नवरा हा टक्कल असणारा आहे हे समजल्यानंतर मुलीने लग्नास नकार दिला. दोन्ही बाजूच्या कुटुंबांनी नववधूची समजूत काढण्याचा, तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.
नंतर हे प्रकरण थेट पोलीस स्थानकामध्ये गेले. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करुनही या मुलीने लग्नास होकार दिला नाही. अखेर पंचायत बोलवण्यात आली. यावेळी नवरीकडच्यांनी आपण मुलीच्या लग्नासाठी पाच लाख ६६ हजारांचा खर्च केला होता, असं सांगितलं. नवरदेवाच्या घरच्यांनी हा सर्व खर्च मुलीच्या आई-वडिलांना परत देण्यास होकार दर्शवला. त्यानंतर नवरदेव आणि सर्व वऱ्हाड नवरीशिवाय पुन्हा कानपूरला परतले.
नवरीच्या काकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नवरदेवाच्या घरच्यांनी मुलाला टक्कल असल्याचं लपवायला नको होतं, अशी प्रतिक्रिया दिली. “त्यांनी आम्हाला आधी कल्पना दिली असती की नवऱ्या मुलाला टक्कल आहे तर आम्ही मुलीला यासंदर्भात सांगितलं असतं. असं ऐनवेळी हे समोर आल्यावर लग्न होईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे,” असं नवरीच्या काकांनी म्हटलं आहे.