सोशल मीडियावर काहीही अगदी क्षणात व्हायरल होऊ शकतं. एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत एखादा फोटो, व्हिडीओ किंवा पोस्ट जाते आणि ती व्हायरल होऊ लागते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला असून त्यावर नेटिझन्स मीम्स देखील करू लागले आहेत. अनेकांना हा फोटो नक्की खरा आहे की खोटा, याविषयी देखील प्रश्न पडले आहेत. त्याला कारणही तसंच आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्याच मांडीवर एक माकड निवांतपणे बसलं असल्याचा हा फोटो आहे. त्याला मांडीवर घेऊन योगी आदित्यनाथ आपलं काम करत असल्याचं दिसत आहे. पण नेमका या फोटोमागचा किस्सा काय आहे? याविषयी खुद्द योगी आदित्यनाथ यांनीच माहिती दिली आहे.
योगी आदित्यनाथ यांचा मांडीवर माकड बसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर त्याविषयी बरीच चर्चा सुरू झाली. त्यासंदर्भात पत्रिका डॉट कॉमने योगी आदित्यनाथ यांनी त्या फोटोमागचा किस्सा सांगितल्याचं वृत्त दिलं आहे. यानुसार, मथुरेमध्ये एका जाहीर कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी या माकडाविषयीचा किस्सा सांगितला आहे.
योगींच्याच मांडीवर का बसलं हे माकड?
योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतल्या या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे, गोरखपूरमधल्या कार्यालयात हे माकड वारंवार त्यांच्या मांडीवर येऊन बसत होतं. एकदा मंदिरात फिरताना त्यांनी एका माकडाला थंडीत कुडकुडताना पाहिलं. योगींनी माकडाला केळं दिलं आणि ते माकड केळं घेऊन निघून गेलं. दुसऱ्या दिवशीही हेच झालं. दररोज हेच होऊ लागलं. योगी आदित्यनाथ त्या माकडाला केळं द्यायचे आणि ते घेऊन ते निघून जायचं. एकदा कामानिमित्त ते बाहेरगावी गेले होते. तेव्हा ते माकड त्यांना शोधत राहिलं. परत आल्यानंतर ते माकड दरवाज्यातच घुटमळलं. शेवटी योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा माकडाला केळं दिलं आणि ते निघून गेलं.
“…अदानींसोबत हवेत उडणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत”; मोदींचा फोटो शेअर करत नेत्याची टीका
२०१८मधला आहे हा फोटो!
दरम्यान, हा फोटो २०१८मधला आहे. योगी आदित्यनाथ यांनी ऑगस्ट २०१८मध्ये मथुरेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये या फोटोमागचा हा किस्सा सांगितला होता. यावेळी मथुरेमध्ये माकडांच्या त्रासाविषयीची अनेक प्रकरणं समोर येत होती. तेव्हा, हनुमान चालीसा वाचल्याने माकडांचा त्रास होणार नसल्याचा उपाय योगी आदित्यनाथ यांनी सांगितला होता! त्यानंतर आता तीन वर्षांनी तो फोटो पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला आहे.