Gadar 2: सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाची सध्या तुफान चर्चा आहे. ‘गदर-२’ येताच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर झेंडा फडकवला. ‘गदर’ प्रमाणेच हा चित्रपटही लोकांना खूप आवडत असून जबरदस्त कमाईही करत आहे. या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडमध्येच १३० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती आणि हा चित्रपट अजूनही तितकाच जोरात आहे.

एकीकडे तिकीटबारीवर अभिनेत्री अमिषा पटेल आणि सनी देओल यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अनेक विक्रम मोडीत काढत असताना या चित्रपटासंदर्भातील एक विचित्र बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील बुदाऊनमध्ये ही घटना घडली आहे. चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर चित्रपटाची कथा सांगणाऱ्या एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे.

तरुणाला घरात घुसून मारलं

समोर आलेल्या माहितीनुसार मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव अमित कुमार गुप्ता असं आहे. अमित कुमार ‘गदर-२’ पाहून आला आणि शेजारी राहणाऱ्या मुलांबरोबर चर्चा करत होता. अमित या मुलांना चित्रपटाची कथा सांगत असतानाच तौसीफ नावाच्या व्यक्तीने रस्त्यावरुन जाताना ही चर्चा ऐकली. या चर्चेतील काही शब्दांवर आक्षेप घेत तौसीफने अमितला हटकले. अमितने आपण केवळ चित्रपटाची कथा मुलांना सांगतोय असं म्हटलं. या दोघांमध्ये थोडा वाद झाला आणि तौसीफ तिथून निघून गेला. मात्र काही वेळाने तौसीफ १० जणांच्या टोळीला घेऊन अमित गुप्ताच्या घरी पाहोचला आणि त्याला मारहाण करु लागला. सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: भंडारदऱ्यात १२ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट २० सेकंदात बुडाली; काळजाचा ठोका चुकवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

घटनास्थळी उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला, जो सध्या वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान घटनास्थळी उपस्थित लोकांनी हे प्रकरण शांत केले, मात्र तौफिकने आपल्याला वाटेतच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अमित गुप्ता यांनी केला आहे. त्यामुळे अमित गुप्ताच्या तक्रारीच्या आधारे तौफिक आणि युसूफ यांच्याविरुद्ध मूसाझग पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी पकडले असून या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.