कोणाच्या आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही, नशिबालाचा खेळ खूप निराळा असतो असं म्हटलं जातं. याचे एक ताजे उदाहरण उत्तर प्रदेशातील नगरपालिका निवडणुकीत समोर आलं आहे. हो कारण शनिवारी उत्तर प्रदेशातील नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान एका अपक्ष उमेदवाराला केवळ ३ मतांनी विजयी घोषित करण्यात आले, पण विजयचा जल्लोश साजरा करण्यासाठी तो उमेदवारच तिथे उपस्थित नव्हता. कारण या उमेदवाराचा निकालाच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या उमेदवाराचा विजय झाल्याचं समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
सुलतानपूर जिल्ह्याचीत घटना व्हायरल –
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सुलतानपूर जिल्ह्यातील कादीपूर नगर पालिकेशी संबंधित आहे. या ठिकाणच्या १० प्रभागासाठी निवडणूक झाली होती. निराला नगर प्रभाग क्रमांक १० मधून अपक्ष उमेदवार संत प्रसाद यांनी निवडणूक लढवली. शनिवारी या प्रभागाचा निकाल जाहीर झाला तेव्हा संत प्रसाद यांनी त्यांचे विरोधक रमेश यांचा अवघ्या ३ मतांनी पराभव केला. संतराम यांना २१७, तर रमेश यांना २१४ मते मिळाली. आंब्याच्या बागेची राखण करत असताना शुक्रवारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संत प्रसाद यांच्या निधनाचे वृत्त समजताच मतमोजणी केंद्रावर उपस्थित असणाऱ्या लोकांनी हळहळ व्यक्त केली.
६५ वर्षीय संत प्रसाद हे बियाणे, फळे आणि भाजीपाला पुरवण्याचा व्यवसाय करायचे. त्यासाठी तो आंब्यांच्या बागेचे कंत्राट घ्यायचे. त्यांना २ मुले आणि ५ मुली आहेत. संत प्रसाद यांच्या निधनामुळे कादीपूर नगरपालिका निराला नगर वॉर्ड क्रमांक १० ही जागा रिक्त होणार असून प्रभाग सदस्यपदासाठी फेरनिवडणूक होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. सध्या या घटनेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शिवाय कोणच्या नशिबात कधी काय घडेल हे सांगता येत नाही असं लोक म्हणत आहे.