कधीकधी अनेक लोकांना आपल्या छोट्या चुकीची खूप मोठी किमंत मोजावी लागते. सध्या उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या पश्चिम भागात राहणाऱ्या एका तरुणाला सोसायटीमध्ये सिगारेट ओढणं चांगलंच महागात पडलं आहे. कारण या व्यक्तीला सोसाटीमधील मेंटेनन्स टीमने त्या व्यक्तीला दंड ठोठावला आहे. ही घटना सुपरटेक इको व्हिलेज १ सोसायटीमध्ये घडली आहे. या सोसायटीमधील तरुणाने सिगारेट ओढून उरलेली सिगारेट दुसऱ्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये फेकल्याप्रकरणी त्याला मेंटेनन्स टीमने १००० रुपयांचा दंड ठोठावला असून भविष्यात असे कृत्य न करण्याचा इशाराही दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुपरटेक इको व्हिलेज वन सोसायटीच्या बी-१४ टॉवरमध्ये एक तरुण त्याच्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभा राहून सिगारेट ओढत होता. तरुणाने सिगारेट संपवल्यावर उरलेली सिगारेट खाली फेकली जी दुसऱ्या फ्लॅटच्या बाल्कनीत पडली. यावेळी त्या फ्लॅटचा मालकाला वरच्या फ्लॅटमधील तरुणाने फेकलेली सिगारेट दिसताच तत्काळ सोसायटीच्या मेंटेनन्स विभागात जाऊन याबाबत तक्रार केली.
त्या व्यक्तीने सांगितले की, त्याच्या फ्लॅटच्या वरती राहणाऱ्या रहिवाशाने खाली सिगारेट फेकली ज्यामुळे फ्लॅटमध्ये आग लागण्याची किंवा मोठी दुर्घटना घडू शकली असती. या प्रकरणाबाबत मेंटेनन्स टीमने सिगारेट ओढणाऱ्या तरुणाला १००० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच भविष्यात असे कृत्य न करण्याच्या सूचनाही दिल्या. तर काही दिवसांपूर्वी गुटखा थुंकणाऱ्या गार्डलादेखील हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मेंटेनन्स टीमने केलेल्या कारवाईनंतर सिगारेट फेकणाऱ्या तरुणाने लेखी माफीही मागितली आहे. तर ग्रेटर नोएडा वेस्टच्या हायराइज हाऊसिंग सोसायटीमध्ये अनेकदा अशा काही कारणाने बाल्कनीमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.