UP Police Action Fact Check Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला व्हिडीओ आढळून आला. दोन मिनिटे ३१ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एक माणूस रस्त्याच्या कडेला असलेल्या काही दुकानांवर हल्ला करताना दिसतोय. याच व्हिडीओत पुढे दुचाकीवरून आलेले पोलिस अधिकारी त्या माणसाला पकडून बेदम चोप देताना दिसतायत. या व्हिडीओसह असा दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ उत्तर प्रदेश पोलिसांनी गुंडांवर केलेल्या कारवाईचा आहे, ज्यात त्यांनी दहशत माजवणाऱ्या गुन्हेगाराला अटक केली. पण, खरंच उत्तर प्रदेशात अशाप्रकारची कोणती कारवाई झाली का, या विषयीचे सत्य जाणून घेऊ..
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर के. पी. त्रिपाठी यांनी व्हायरल दाव्यासह व्हिडीओ शेअर केला.

इतर युजरदेखील त्याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत.


तपास:
आम्ही व्हिडीओमधून कीफ्रेम्स काढून आणि त्यावर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.
आम्हाला आढळले की, व्हिडीओ दोन वर्षांपूर्वी रेडिट प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आला होता.
रिव्हर्स इमेज सर्चमधून आम्हाला आढळले की, काही बातम्यांमध्ये कीफ्रेम्सचा वापर करण्यात आला होता.
आम्हाला मिरर नाऊच्या वेबसाइटवर एक बातमी मिळाली. ही बातमी २९ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाली होती. ही घटना महाराष्ट्रातील पुणे येथील असल्याचे नमूद करण्यात आले होते.

या बातमीत असेही नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, इथे गुंडांच्या एका गटाने अनेक दुकानांची तोडफोड केली. या गुंडांनी शस्त्रांसह परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखातही व्हिडीओचे स्क्रीनशॉट सापडले.

ही बातमी ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाली होती.
ह्या बातमीत नमूद केले आहे : महाराष्ट्र विधानसभेत अलीकडेच तथाकथित ‘कोयता गँग’वरून मोठ्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, हातात कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या घटना अजूनही या गँगकडून सुरू आहेत. बुधवारी रात्री घडलेल्या अशाच एका घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे गुन्हेगारांना लगाम घालण्यात पोलिसांच्या अपयशाबद्दल जनतेत रोष निर्माण झाला आहे. एका अल्पवयीन मुलासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
निष्कर्ष :
दुकानांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केल्याचा व्हायरल व्हिडीओ अलीकडील नाही आणि तो उत्तर प्रदेशातीलही नाही. हा व्हिडीओ पुण्यातील २०२२ चा आहे, जो दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे.