रस्त्यावरून वाहन चालवताना अनेकजण वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत. कोहीजण हेल्मेट घालत नाही, तर काही लोक खूप वेगाने वाहन चालवतात आणि ट्रॅफिक सिग्नलदेखील पाळत नाही. त्यामुळे पोलीस अशा लोकांना वाहतूक नियमाचे पालन करण्यासाठी जागरूक करत असतात. जसा काळ बदलला तसं पोलिसांनीदेखील आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल केला. आजकाल अनेक पोलीस लोकांना काही संदेश देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत, ज्यामध्ये पोलीस लोकांना वाहतुकीचे नियम मोडू नका, असं सांगण्यासाठी काही मजेदार व्हिडीओ किंवा मिम्स शेअर करत असतात. सध्या यूपी पोलिसांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु असून तो नेटकऱ्यांना आवडल्याचंही पाहायला मिळत आहे.
पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही लोकांनी बाईकच्या मागे खाट बांधल्याचं दिसत आहे. मात्र बाईकवरुन खाट घेऊन जात असताना बाईकचा तोल बिघडण्याची शक्यता असते. अशा स्थितीत अपघात होण्याचीही दाट शक्यता असते. हाच धोका ओळखून यूपी पोलिसांनी रस्ता सुरक्षेसंदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला पोलिसांनी मजेशीर कॅप्शनदेखील दिले आहेत, जी वाचून अनेकांनी पोलिसांच्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक केलं आहे.
हेही पाहा- महिलांना मोफत बससेवा जाहीर! महिला आमदार बस चालवून शुभारंभ करायला गेल्या, ‘असं’ केलं लाखोंचं नुकसान
यूपी पोलिसांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, तुमच्या ‘शांत झोपेसाठी’ रस्ता सुरक्षा खाटेवर का? माल वाहून नेण्यासाठी योग्य वाहनाचा वापर करा असं लिहिलं आहे. यूपी पोलिसांनी २३ सेकंदांचा हा मजेशीर आणि तितकाच क्रिएटिव्ह व्हिडिओ शेअर करत लोकांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगण्यांचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडीओच्या माध्यमातून अवजड मालासाठी योग्य वाहन वापरण्याची विनंती केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर पोलिसांनी लोकांना समजवण्यासाठी वापरलेल्या अनोख्या पद्धतीचे अनेक नेटकरी कौतुक करत आहेत.