Emotional video: भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी म्हणजे आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या असंख्य मुले-मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासूनच यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. त्यासाठी विशेष कोचिंग क्लास लावले जातात. आजकाल तर अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लासमध्ये जाऊन याची तयारी केली जाते. तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळण्याची हमी नसते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. मात्र कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या पोरानं मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणलंय.

वडील मेंढपाळ, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक. पहिल्यापासूनच अधिकारी होणाचे स्वप्न होते अन् अखेर बिरदेव सिध्दाप्पा डोणे या मेंढपाळाच्या मुलाने ते पुर्ण केले. बिरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे. निकाल लागताच केलेल्या कौतुकाचा सत्काराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बिरदेव ढोणे यांना पिवळ्या रंगाचा फेटा घातला जात आहे, यावेळी त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधानच सर्वकाही सांगून जातोय.मंगळवारी जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात कोल्हापुरातील यमगे गावच्या बिरदेव ढोणे यांनी ५५१ रँक पटकावून आयपीएस पदाला गवसणी घातली. भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याचा मित्राचा फोन आला. तेव्हा बिरदेव हे बेळगाव जवळच्या एका धनगरवाड्याजवळ मेंढरं चारत होते. निकाल जाहीर झाल्याची वार्ता यमगे गावात पोहोचली तेव्हा गावचा धनगरवाडा मेंढपाळाच्या पोरानं मिळवलेल्या लख्ख यशात उजाळून निघाला.

पाहा व्हिडीओ

घरात जागा नसल्याने शाळेच्या व्हरांड्यात करायचा अभ्यास

बिरदेवचं बालपण डोंगरदर्‍यांमध्ये मेंढ्या चारत, कधी उघड्यावर अभ्यास करत तर कधी पोटासाठी झगडत गेले. काही तरी मोठं करायचं, स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा अभिमान वाटावा असं काहीतरी घडवायचं असे स्वप्न त्याने उराशी बाळगले. गावातील शाळेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दोन खोलीचं घर अभ्यास करायला जागा नसल्याने गावातील मराठी शाळेचा व्हरांडा तो अभ्यासामध्ये व्यस्त असायचा.

दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून तो मुरगूड केंद्रात पहिला आला होता. यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्याने आय.पी.एस होण्याचे स्वप्न व्यक्त केले होते. बारावी विज्ञान शाखेत ही चमकदार कामगिरी करत ८९ टक्के गुण मिळवत मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला होता. त्यानंतर त्याने पुणे सी.ओ.इ .पी येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले.