UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांची तयारी करून घेणाऱ्या गाईड शुभ्रा रंजन यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या मुघल सम्राट अकबर व श्रीराम यांची तुलना करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर या व्हिडीओवर नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भात काहींनी शुभ्रा रंजन यांच्या बाजूने भूमिका घेतली असून काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. या व्हायरल व्हिडीओवरून वाद निर्माण झाल्यानंतर स्वत: शुभ्रा रंजन यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीमध्ये शुभ्रा रंजन या एका ऑनलाईन सेशनमध्ये उमेदवारांना भारतीय व पाश्चात्य राजांमधील फरक समजावून सांगताना दिसत आहेत. त्याचवेळी त्यांनी भारतातील वेगवेगळ्या काळातील राजांची कार्यपद्धतीही समजावून सांगितली. यासाठी त्यांनी श्रीराम व अकबर यांची उदाहरणं घेतली. मात्र त्यावरूनच वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण जारी केलं आहे.

“श्रीराम यांची एक राजा म्हणून सत्ता अमर्यादित नसून ती प्रथा-परंपरांनी निश्चित केली आहे. त्यामुळे श्रीराम नैतिकता काय आहे हे सांगत नसून ते प्रथा-परंपरांमधून चालत आलेल्या नैतिकतेचं संरक्षण आणि अंमलबजावणी करतात. पण अकबर मात्र स्वत: नैतिकता ठरवतो आणि त्याचा निर्णय सगळ्यांवर नैतिकता म्हणून लागू होतो”, असं शुभ्रा रंजन या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत.

व्हिडीओवर आक्षेप काय?

शुभ्रा रंजन यांच्या या संपूर्ण व्हिडीओमधील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवले. काहींनी सायबर पोलिसांकडे त्यांची तक्रारही केल्याचं नमूद केलं आहे. शुभ्रा रंजन यांनी धर्मविरोधी कृत्य केलं असून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत, असा दावाही करण्यात आला. त्याशिवाय, रंजन या UPSC सारख्या परीक्षेतून सनदी अधिकारी बनण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मनात चुकीच्या गोष्टी भरवत असल्याचाही आरोप काहींनी केला.

शुभ्रा रंजन यांचं स्पष्टीकरण!

दरम्यान, शुभ्रा रंजन यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. जर तसं काही झालं असेल तर मी त्यासाठी माफी मागते. तुम्ही जर तो संपूर्ण व्हिडीओ पाहिला, तर लक्षात येईल की मी प्रभू श्रीरामाचं राज्य खऱ्या अर्थानं आदर्श राज्य होतं हे समजावून सांगत आहे”, असं शुभ्रा रंजन यांनी त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

Bangladeshi Youtuber Viral Video: भारतात अवैधरीत्या कसं शिरायचं, बांगलादेशी यूट्यूबरच्या व्हिडीओमुळे खळबळ; नेटिझन्सकडून कारवाईची मागणी!

“जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, ती पूर्ण व्हिडीओमधली फक्त एक क्लिप आहे. आमच्या वर्गात झालेल्या सविस्तर चर्चेतला तो फक्त एक छोटासा भाग आहे. ती चर्चा तुलनात्मक अभ्यासासंदर्भात होती. अनावधानाने त्यातून काही चुकीचा संदेश गेला असेल, तर आम्ही त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो”, असंही त्यांनी स्पष्टीकरणात नमूद केलं आहे.

UPSC मार्गदर्शक शुभ्रा रंजन यांचं स्पष्टीकरण! (शुभ्रा रंजन यांच्या एक्स हँडलवरून साभार)

शुभ्रा रंजन यांचं समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया

काही नेटिझन्सनी शुभ्रा रंजन यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत. “शुभ्रा रंजन यांनी म्हटलंय की अकबर स्वत:च नैतिकतेसंदर्भातले नियम ठरवत होता. पण श्रीराम मात्र प्रथा-परंपरांनी निश्चित झालेली नैतिकता पाळत होते. श्रीराम यांच्या कामाचा एक राजा म्हणून आढावा घेण्याच गैर काय आहे?” असा प्रश्न काही युजर्सनं उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc tutor shubhra ranjan viral video akbar ram comparison pmw
Show comments