Konkan Railway Viral Video : मुंबई आणि त्याच्या उपनगरांमध्ये बहुतांश लोक उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे कोकणात त्यांच्या गावी जातात. त्यामुळे नेहमीच गर्दी असलेल्या कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये उन्हाळी सुट्यांमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळतेय. रस्तेमार्गे कोकणात जाणे वेळखाऊ आणि खर्चीक असल्याने कोकणवासीय रेल्वेला प्राधान्य देतात. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्या हाउसफुल्ल होत आहेत. अशातच काही दिवसांपासून सर्व रेल्वेगाड्यांमध्ये विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढतेय. अशा परिस्थितीत ट्रेनमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध रेल्वेस्थानकांवर रेल्वे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र, ट्रेनमधील गर्दीचे कारण देत या पोलिसांकडून अनेक आरक्षित तिकीटधारक प्रवाशांनाही रेल्वेस्थानकात रोखण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वेस्थानकातच पोलिसांना जाब विचारण्यास सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये एका रेल्वेस्थानकावरील दृश्य दिसत आहे. त्यात ट्रेनमध्ये आधीच गर्दी असल्याने पोलिसांनी अनेक प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश नाकारला. त्यांना ट्रेनमध्ये चढण्याआधीच दरवाजाजवळ अडवण्यात आले. हा व्हिडीओ शुक्रवारी (२४ मे) पनवेल रेल्वेस्थानकावर शूट करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
ट्रेनमध्ये चढू न दिल्याने कोकणवासीयांचा पनवेल स्थानकावर गोंधळ
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक प्रवासी पनवेल रेल्वे स्थानकावर आरपीएफ अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद घालताना दिसत आहेत. यावेळी एक एक्स्प्रेस ट्रेन रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबलेली दिसतेय; पण तिचे दरवाजे मात्र आतून बंद करण्यात आलेत. अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये चढण्यास न मिळल्याने चिडलेल्या अनेक प्रवाशांनी आरपीएफ अधिकाऱ्यांना घेरले. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
यावेळी काही प्रवासी ट्रेनच्या आत असलेल्या लोकांना डब्यात प्रवेश करण्यासाठी दरवाजा उघडण्याची विनंती करताना दिसत आहेत. अनेक जण रागा-रागात आतील प्रवाशांना धमकावताना दिसले. त्यात अनेक आरक्षित तिकीट असलेल्या लोकांचाही समावेश होता; पण गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये त्यांनाही चढता न आल्याने ते संतप्त झाले होते.
@kapsology नावाच्या एका युजरने एक्सवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये लिहिण्यात आले, “प्रवाशांकडून रेल्वेच्या खराब सेवा-सुविधांबाबत तक्रार केली जात आहे, तसेच कोकणात अधिक गाड्या वारंवार सोडण्याची गरज या प्रसंगातून अधोरेखित होत आहे. गर्दीने भरलेली एक्स्प्रेस ट्रेन आणि तितकीच गर्दी प्लॅटफॉर्मवर यांमुळे प्रवासी सुविधांअभावी प्रवाशांची दयनीय अवस्था दिसून येते.
व्हिडीओच्या शेवटी लिहिलेय, “रेल्वे आणि सरकारने याकडे लक्ष देत समस्यांवर तोडगा काढावा ही विनंती. कारण- ही एक धोक्याची घंटा आहे.” ही गंभीर समस्या असून ती रेल्वे प्रशासन आणि सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडीओ. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाही टॅग करण्यात आलेय.
कोकणात जाणाऱ्या रेल्वेने प्रवाशांच्या सोईसाठी दरवर्षी अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या जातात. मात्र, त्या गाड्याही फुल होत असल्याने विविध रेल्वेस्थानकांतून आणखी गाड्या सोडण्याची विनंती कोकणवासीयांकडून केली जात आहे.