कर्नाटकमधील कोडागु येथील महामार्गाजवळ एक विचित्र फलक लागल्याचे आढळून आले आहे. सोशल मीडियावर या फलकाचा फोटो आता व्हायरल होत आहे. कन्नडमध्ये लिहिलेल्या संदेशाला इंग्रजीत भांषातर करताना झालेली चूक भलतीच व्हायरल झाली. कोडागु कनेक्ट या सोशल मीडिया हँडलवरू सदर फलकाचा फोटो पोस्ट करण्यात आला. ज्यावर इंग्रजीत “Urgent make an accident” असे लिहिले गेले होते. “अतिवेग अपघातास कारणीभूत ठरू शकतो”, या कन्नड संदेशाचे भाषांतर करताना झालेली चूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
या गंमतीशीर फलकामुळे इंटरनेटवर मात्र सरकारवर टीका केली जात आहे. ‘तातडीने अपघात करा’, या भाषांतराची अनेकजण खिल्ली उडवत आहेत. तसेच सरकारने अतिशय सुमार दर्जाचे भाषांतर केले म्हणून टीका केली जात आहे. तसेच काही लोकांना हा फलक गंमतीचा भाग वाटतो.
एका युजरने म्हटले की, अपघात झाल्यास त्याला हे फलक कारणीभूत ठरू शकते. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, यापेक्षा चॅटजीपीटी वापरून भाषांतर करायला हवे होते. तर तिसऱ्या एका युजरने म्हटले की, कन्नड भाषेतच फलक असावेत, इंग्रजी भाषेची काहीही गरज नाही. तर चौथ्या युजरने म्हटले की, नशीब अर्जंट शब्दाच्या पुढे स्वल्वपिराम नाही दिला. नाहीतर संपूर्ण अर्थच बदलला असता.
मार्च महिन्यात कोडागु कनेक्ट या एक्स हँडलवरून आणखी एक गमतीशीर फलक शेअर करण्यात आला होता. गुगल मॅप चुकीचा रस्ता दाखवतो, असा संदेश फलकावर लावण्यात आला होता. या फलकावर लिहिले होते की, गुगल चुकीचे आहे. हा रस्ता क्लब महिंद्राला जात नाही. सदर फलक प्रशासनाने नाही तर स्थानिकांनी या ठिकाणी लावला होता. रस्ता चुकलेल्या प्रवाशांना माहिती देऊन वैतागलेल्या ग्रामस्थांनी थेट फलक लावून प्रवाशांना जागृत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला.