सुंदर आणि तरुण दिसावं असं कोणाला वाटत नाही. प्रत्येक जण सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो. कोणी आपल्या आहाराकडे लक्ष देतो, कोणी व्यायामाकडे, तर कोणी आपल्या झोपेकडे. थोडक्यात सामान्य व्यक्ती निरोगी जीवनशैली राखून चिरतरुण राहण्याचा प्रयत्न करत असते. काही लोक सुंदर किंवा तरुण दिसण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. यांपैकीच एक पद्धत म्हणजे रिव्हर्स एजिंग, म्हणजे वाढते वय थांबविण्याचा प्रयत्न. यासाठी लोक कित्येक प्रकाराचे निरोगी पदार्थ खातात, आणि स्वत:ला जास्तीत जास्त तरुण ठेवण्याचा प्रयत्न करतात.
या रिव्हर्स एजिंगचं वेड सध्या झपाट्याने वाढत आहे. या वेडापायीच एका व्यक्तीचं नाव चर्चेत आलं आहे. ब्राय जॉन्सन नावाच्या या व्यक्तीने सध्या प्लाझ्मा एक्सचेंजद्वारे स्वत:ला १९ वर्षीय तरुणासारखे दिसण्याचे आव्हान दिले आहे.
ब्रायन जॉन्सन कोण आहे?
कॅलिफोर्नियास्थित उद्योजक ब्रायन जॉन्सन हे करोडपती आहेत. जेव्हा तुमच्याकडे असा पैसा असतो, तेव्हा तुमच्याजवळ नाही अशी कोणतीही गोष्ट नसते. ब्रायनला काळाप्रमाणे वृद्ध न होता तरुण दिसायचे आहे. ब्रायन (Bryan Johnson) अमेरिकेत राहतो. त्याचे वय ४५ वर्षे आहे. व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता आणि बायोटेक कंपनीचा सीईओ आहे. ब्रायनची इच्छा आहे की, तो म्हातारा दिसण्याऐवजी १८ वर्षांनी लहान दिसला पाहिजे, जसा तो सध्या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. ब्रायन वृद्धत्वाची प्रक्रिया थांबवण्यासाठी आणि स्वत:ला तरुण ठेवण्यासाठी दरवर्षी सुमारे १६ कोटी रुपये खर्च करतो.
हेही वाचा – Viral Video: कोरिअन व्यक्तीची बिहारी ऐकून थक्क झाले नेटकरी; म्हणाले, ”हा तर…”
अशी आहे ब्रायनची दिनचर्या, दररोज खातो १०० गोळ्या
ब्रायन जॉन्सन पहाटे पाच वाजता उठतो. सकाळी पहिली गोष्ट, तो ‘ग्रीन जायंट’ नावाची स्मूदी पितो. एका दिवसात मोजून फक्त १९९७ कॅलरीज घेतो. आपण जेवढे खातो तेवढे पचवण्याचा व्यायाम करतो. त्याच्या आहारामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया केलेले अन्न नसते. ऑलिव्हर जौलमन हे ब्रायनचे वैयक्तिक डॉक्टर आहेत. ऑलिव्हरकडे ३० डॉक्टरांची टीम आहे जी ब्रायनची काळजी घेते. ब्रायन सकाळपासून संध्याकाळपर्यंत १०० हून अधिक गोळ्या खातो. या औषधांमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि रोगांशी लढण्यासाठी औषधे असतात. दिवसभरात २५ प्रकारचे व्यायाम करतो. जॉन्सनचा असा दावा आहे की, या दिनचर्येमुळे त्याने त्याचं जैविक वय किमान पाच वर्षांनी कमी केलं आहे.
दररोज ५-६ थेरपी आणि चरबी कमी करणारी इंजेक्शन्स घेतो
ब्रायन दररोज ५-६ थेरपी घेतो. यात त्वचेची चिकित्सा (Skin Thearpy) जास्त आहे. फॅट्स कमी करण्यासाठी, म्हणजेच लठ्ठपणा, शरीरातील अतिरिक्त मांस कमी करण्यासाठी इंजेक्शन घेतो. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, “डॉक्टरांची एक टीम वेळोवेळी त्याची काळजी घेते आणि त्याचे निरीक्षण करते. त्याच्या नियमित एमआरआय, रक्त तपासणी आणि प्रत्येक अवयवावर लक्ष ठेवले जाते. हा सर्व त्यांच्या नित्य प्रक्रियेचा भाग आहे.”
आता मुलाकडून प्लाझ्मा घेतला
अँटी एजिंग ही एक कठीण प्रक्रिया आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, ब्रायन जॉन्सनने गेल्या महिन्यात डलासमध्ये रक्ताची अदलाबदली करून आपल्या मुलाचा प्लाझ्मा घेतला आहे. ब्रायनने त्याचा प्लाझ्मा त्याच्या वडिलांना दिला आहे. ही प्रक्रिया वर लिंक केलेल्या व्हिडीओमध्येदेखील दर्शविली आहे. त्याला ट्राय जनरेशनल ब्लड स्वॅपिंग ट्रीटमेंट असे नाव देण्यात आले आहे. ब्रायनने याआधीही तरुणांकडून प्लाझ्मा घेतला आहे, पण या वेळी त्याने आपल्या मुलाकडून प्लाझ्मा घेतला आहे.
रक्त बदलण्याच्या या तंत्राची जगभरात चर्चा आहे. प्लाझ्मा एक्सचेंजची ही प्रक्रिया तीन एप्रिल रोजी झाली. ब्रायनने त्याचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केले आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडीओ त्याच्या वडील आणि मुलासोबत शेअर केला आहे. सदैव तरुण राहण्याच्या इच्छेने, जॉन्सन ब्लूप्रिंट नावाचा प्रकल्प चालवतो. हा ब्लूप्रिंट अँटी-एजिंग उपक्रमाचा एक भाग आहे, जो त्याच्या फॉलोअर्सना त्यांचे वजन, बॉडी मास इंडेक्स, शरीरातील फॅट्स, रक्तातील ग्लुकोजची पातळी नियमितपणे मोजण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहित करतो.