‘टिंडर’ हे डेटिंग अॅप वापरणाऱ्यांची संख्या खूप आहे. मात्र या अॅपवरूनही अनेकांची फसवणूक होत असल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत समोर आल्या आहे. यातल्या एका घटनेत तर बॉलिवूड स्टार सैफ अली खानचा फोटो वापरून ४५ वर्षीय महिलेची फसवणूक करण्यात आली होती.
अमेरिकेत राहणाऱ्या अॅना रो या महिलेला डेटिंग अॅपवरून अँथनी रे नावाच्या एका विवाहित व्यक्तीनं फसवलं होतं. अॅनाची फसवणूक करण्यासाठी संबधीत व्यक्तीनं आपल्या टिंडर प्रोफाईलवर सैफ अली खानचा फोटो अपलोड केला होता. २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘कल हो ना हो’ मधला हा फोटो होता. त्यावेळी या महिलेला हा फोटो बॉलिवूडमधल्या अभिनेत्याचा असल्याची शंकाही आली नव्हती. .
अँथनीचे फोटो आवडल्यानंतर अॅना आणि अँथनी डेटिंग अॅपद्वारे संपर्कात आले. आपण घटस्फोटीत असल्याचं त्यानं अॅनाला सांगितलं होतं. बराच काळ मेसेजद्वारे संपर्कात आल्यानंतर या दोघांमध्येही जवळीक निर्माण झाली. त्यानंतर आई आजारी असल्याचं निमित्त सांगून अँथनीनं पळ काढला होता. २०१५ साली हा प्रकार घडला होता. आपली फसवणूक झाल्याची तक्रारही महिलेनं पोलिसांकडे केली होती. पण यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.
गेल्या तीन वर्षांत या अॅपचा गैरवपार होऊन फसवणूक होण्याचे प्रमाण वाढलं आहे. दर आठवड्याला यासंबधीच्या किमान वीस तक्रारी पोलिसांकडे येतात अशी अधिकृत आकडेवारी सांगत असल्याचं डेली मेलनं म्हटलं आहे. आकडेवारीनंतर टिंडरद्वारे महिलांची कशा प्रकारे फसवणूक केली गेली याच्या केस स्टडीज समोर आल्यात त्यातली ही एक केस आहे.