अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. व्हाइट हाऊसमधील ट्रम्प यांची पहिलीच दिवाळी असल्याने भारतीय वंशाचे सर्व प्रतिधिनीही यावेळी उपस्थित होते. ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था निर्माण करणाऱ्या भारतीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही दिवाळी साजरी करत आहोत’ असं ट्रम्प यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर कार्यालयात दिवाळी साजरा करतानाचा व्हिडिओही त्यांनी अपलोड केला आहे.
‘अमेरिकेत अनेक भारतीय राहतात. अमेरिकेच्या जडणघडणीत भारतीयांचा मोठा वाटा आहे. भारतीयांनी कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. अमेरिकेत राहणारे हिंदू धर्मीय या महान देशाचाच भाग आहे. त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या समस्त हिंदूंना शुभेच्छा’ असं लिहित भारत अमेरिका मैत्रीच्या नात्याला ट्रम्प यांनी पुन्हा एकदा उजाळा दिला. दिवाळीनिमित्त ट्रम्प यांचे कार्यालय झेंडूच्या माळांनी सजवलं होतं. अमेरिकी सरकारमधील भारतीय वंशाचे सर्व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. इव्हाकांदेखील या कार्यक्रमात आर्वजून सहभागी झाली होती.
दिवाळी साजरी करण्याची परंपरा माजी राष्ट्राध्यक्ष जार्ज बुश यांच्यापासून सुरू झाली. बुश स्वत: यात सहभागी झाले नसले, तरी व्हाइट हाऊसच्या कॉम्प्लेक्समध्ये दिवाळी साजरी केली जायची. ही परंपरा माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील जपली. २०१६ मध्ये ओबामांनी ओव्हल ऑफिसमध्ये दिवाळी साजरी केली होती.