अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर एका कार्यक्रमादरम्यान घटना घडली असून यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बुधवार २१ सप्टेंबरला जो बायडेन न्यूयॉर्क येथे ग्लोबल फंडच्या सातव्या परिषदेला संबोधित करत होते. आपले भाषण संपल्यानंतर ते मंचावरून खाली उतरत होते. मात्र उतरताना ते अचानक थांबले. यावेळी ते हरवल्यासारखे दिसत होते. मंचावरून खाली येताना आपल्याला पुढे काय करायचे आहे हे ते विसरले आहेत असे वाटते.
या कार्यक्रमादरम्यान बायडेन म्हणाले, ‘जे महत्त्वाचे आहे त्यासाठी लढल्याबद्दल धन्यवाद. हे सर्व जीव वाचवण्यासाठी आहे आणि त्यात कोणतंही दुमत नाही. आमच्या भागीदारांसह, आम्ही सर्व समुदाय निरोगी आणि मजबूत राहतील याची खात्री करू. जेणेकरून लोक सर्वत्र सन्मानाने जगू शकतील.’ व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की भाषण संपल्यानंतर त्यांना मंचावरून खाली यायचे होते, पण ते अचानक थांबले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने त्यांचे आभार मानले, यानंतर बायडेन मंचावरून खाली आले.
एड्स, क्षयरोग आणि मलेरियाचा सामना करण्यासाठी निधी उभारण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यातून १४.२५ अब्ज डॉलर निधी जमा झाला. बहुपक्षीय आरोग्य संस्थेसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे. दरम्यान बायडेन यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत ६० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर, एका व्यक्तीने या व्हिडीओची खिल्ली उडवत म्हटलंय, ‘मला वाटले की हा स्केरी मुव्ही ३ आहे.’
बायडेन यांच्याबरोबर सार्वजनिक ठिकाणी असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी एप्रिलमध्ये नॉर्थ कॅरोलिना येथील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात त्याच्यासोबत असेच काहीसे घडले होते. भाषण संपवून ते अचानक मागे वळले आणि हवेत हस्तांदोलन करू लागले. याबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती.