प्रेमाला देशाच्या सीमांचं बंधन नसतं, असा संवाद चित्रपटात आपण ऐकतो. खऱ्याखुऱ्या आयुष्यात या संवादाला साजेशा अनेक घटना घडत असतात. प्रेमासाठी पाकिस्तानातून मुलाबाळांसर भारतात आल्याचं सीमा हैदरचं प्रकरण ताजं आहे. त्यातच आता अमेरिकेतील एक तरुणी सोशल मीडियावर सापडलेल्या प्रेमासाठी थेट अमेरिकेतून आंध्र प्रदेशच्या खेडेगावात आली आहे. जॅकलिन फोरेरो ही अमेरिकेतील फोटोग्राफर आंध्र प्रदेशच्या खेडेगावातील चंदनच्या प्रेमात पडली.
१४ महिन्यांपूर्वी दोघांची इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली होती. Hi या एका शब्दापासून सुरू झालेला त्यांच्या संभाषणाचा प्रवास लग्नापर्यंत पोहोचला. फोरेरोने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात लिहिले की, १४ महिन्यांचा आमचा एकत्रित प्रवास आता नव्या वळणावर पोहोचत आहे.
आणखी एका पोस्टमध्ये फोरेरोने ४५ सेकंदाची एक क्लीप शेअर केली आहे. ज्यामध्ये सुरुवातीच्या संभाषणापासून प्रेम होईपर्यंत काय काय झालं? हे फोटो आणि स्क्रिनशॉटच्या माध्यमातून दाखवलं आहे. “मी पहिल्यांदा चंदनला मेसेज केला होता. त्याचं प्रोफाइल मला आवडलं. तो एक खरा ख्रिश्चन माणूस असून त्याला धर्मशास्त्राची जाण आहे”, असं फोरेरोनं म्हटलं.
फोरेरोनं पुढं म्हटलं की, संगीत, कला आणि फोटोग्राफी हे आमच्यातलं साम्य आहे. आठ महिने ऑनलाइन डेटिंग केल्यानंतर आणि माझ्या आईची परवानगी मिळाल्यानंतरआता आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मी आता आयुष्यभरासाठी भारतात आली आहे.
चंदन आणि आपल्या नात्याबाबत लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया असल्याचे फोरेरोने सोशल मीडिया लिहिलं आहे. “लोक आमच्या नात्याबद्दल वेगवेगळे कयास बांधत आहेत. काहींनी समर्थन दिलं तर काहींनी अतिशय वाईट मत व्यक्त केलं. काही जणांनी मौन बाळगणं पसंत केलं तर काहीनी कौतुक केलं. तसेच काहींनी वयाचा विचार करायला लावला. मी चंदनपेक्षा नऊ वर्षांनी मोठी आहे.”
चंदन आणि फोरेरोच्या या जोडीला सोशल मीडियावर मात्र चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. एका युजरने लिहिलं की, वयामधील अंतर महत्त्वाचं नाही. माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या वयातही अंतर आहे. जर तुमचं एकमेकांवर खरं प्रेम असेल तर काही बिघडत नाही. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं की, तुम्ही दोघंही सुंदर दिसत आहात.