Hindu Panchang For Crime Hike: उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक (डीजीपी) विजय कुमार यांनी राज्यभरातील पोलिस अधिकाऱ्यांना कोणत्या कालावधीत गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे हे जाणून घेण्यासाठी हिंदू कॅलेंडर किंवा पंचांग वापरण्याचे निर्देश दिले आहेत. १४ ऑगस्टला एक परिपत्रक पाठवून डीजीपी म्हणाले की, रेकॉर्डच्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की ‘अमावस्येच्या’ एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रात्री गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यानुसार जर आपण हिंदू दिनदर्शिका वापरून अधिक सतर्क झालो तर गुन्ह्यांची वारंवारता कमी होण्यास मदत होऊ शकते.
हिंदुस्थान टाइम्सने उत्तर प्रदेश पोलिस महासंचालकांनी जाहीर केलेल्या परिपत्रकाच्या हवाल्याने याविषयी माहिती दिली आहे. या परिपत्रकात लिहिले होते की, “राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये, मुख्यालय स्तरावर घडलेल्या घटनांचे विश्लेषण केल्यावर असे आढळून आले की हिंदू दिनदर्शिकेनुसार अमावस्येच्या एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रात्रीच्या वेळी अधिक गुन्हे घडतात. हे विश्लेषण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या पातळीवर दर महिन्याला केले जावे.” हे परिपत्रक पंचांगच्या प्रतीसह जारी करण्यात आले आहे.
“१६ ऑगस्ट, १४ सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी अमावास्या येणार असून, त्याच्या एक आठवडा आधी आणि नंतर अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. सशक्त पोलीस दलाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना जगण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले पाहिजे. यासाठी रात्रीची गस्त अधिकाधिक प्रभावीपणे करणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्यांच्या सुरक्षेबाबत विश्वास निर्माण होईल, असे परिपत्रकात म्हटले आहे.
हे ही वाचा<< महिलांनो ओढणी गळ्यात घेऊन बाईकवर बसताय? वसईतील हृदयविदारक घटना डोळे उघडेल, मंदिरातून येतानाच…
दरम्यान, परिपत्रकात पोलिस अधिकार्यांना गुन्हेगारी हॉटस्पॉट्स ओळखण्यास आणि गुन्हेगारीच्या घटनांचा नकाशा तयार करण्यास सांगितले आहे. जेणेकरुन भविष्यात नियोजनबद्ध प्लॅन करता येऊ शकतो. तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतोय का हे कमेंट करून नक्की कळवा.