काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राहुल गांधी पायऱ्यांवर तोल जाऊन पडलेल्या कॅमेरामनला तात्काळ धावून मदतीचा हात देत असल्याचं दिसत आहे. ओरिसातील भुवनेश्वर विमानतळाजवळ हा प्रकार घडला. राहुल गांधींचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एका ट्विटर युजरने नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी आणि मोदींची तुलना केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विमानतळाबाहेर राहुल गांधी असताना त्यांच्याभोवती बघ्यांची, कार्यकर्त्यांची तसेच पत्रकार व कॅमेरामनची गर्दी झाली होती. यावेळी एका कॅमेरामनचा पायऱ्यांवर तोल गेला व तो गडगडत पडला. काही पावलांवरच असलेल्या राहुल गांधींनी अक्षरश: क्षणार्धात त्याच्या दिशेने धाव घेतली व त्याला मदतीचा हात दिला. सदर कॅमेरामन उठून उभा राहिल्यावर व त्याला विशेष इजा झाली नसल्याचे लक्षात आल्यावर राहुल गांधी तेथून निघून गेले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी राहुल गांधींचं या संवेदनशीलतेबद्दल कौतुक केलं आहे.

दरम्यान एका युजरने नरेंद्र मोदींचा 2013 मधील एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये मोदी भाषण देत असताना स्टेजवरच पोलीस अधिकारी बेशुद्ध होऊन खाली पडतो. मात्र नरेंद्र मोदी त्याच्याकडे पाहूनही लक्ष न देता आपलं भाषण सुरु ठेवतात. विशेष म्हणजे जो अधिकारी बेशुद्ध पडला ते पोलीस महासंचालक अमिताभ पाठक होते.

त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी होते. नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात अमिताभ पाठक स्टेजवर त्यांच्या मागेच बेशुद्ध येऊन पडले होते. उच्च रक्तदाब आणि साखरेचं प्रमाण वाढल्याने त्यांना भोवळ आली होती. तिथे उपस्थित वैद्यकीय टीमने अमिताभ पाठक यांच्यावर उपचार केले. त्यादिवशी अमिताभ पाठक यांचा मृत्यू झाल्याचा खोटा मेसेज व्हायरल झाला होता. पण दुर्दैवाने एका आठवड्याने हे वृत्तं खरं ठरलं.

डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर अमिताभ पाठक सुट्टी घालवण्यासाठी कुटुंबासोबत थायलंडला गेले होते. तिथे स्विमिंग पूलमधून बाहेर आल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.