दिवाळी उत्साहात सर्वत्र साजरी होत आहे. दिव्यांची रोषणाई, फराळाचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ, नवीन कपड्यांची आणि घरातल्या वस्तुंची खरेदी यांमुळे या सणाबाबत एक विशेष आकर्षण असते. प्रत्येकजण आपल्या कुटुंबाबरोबर आनंदात हा सण साजरा करत आहे. पण प्रत्येकासाठी सण आनंद घेऊन येणारे असतातच अस नाही. अनेक गरीब घरांमध्ये जिथे रोज काय खायचे हा प्रश्न असतो तिथे सणांसाठी खर्च करण्यासाठी पैसे कुठून येणार? इतर घरातील लहान मुलांप्रमाणे गरीब घरातील मुलांची देखील सण साजरा करण्याची इच्छा होत असेल, पण परिस्थितीपुढे त्यांची इच्छा दरवर्षी अपूर्ण राहत असेल. अशाच काही मुलांची दिवाळी आनंदी करण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री नंद गोपाल वर्मा यांनी घेतला. त्यांच्या या मदतीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
युपीतक या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री नंद गोपाल वर्मा यांनी शेकडो गरीब मुलांची दिवाळी आनंदी केली. त्यांनी ६०० हून अधिक गरीब मुलांना मॉलची सफर घडवली, इतकच नाही तर या मुलांना हवी ती शॉपिंग करण्याची मुभा देण्यात आली होती, त्यामुळे या मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पैशांच्या अभावी मॉलमध्ये जाण्याचा केवळ विचार करणाऱ्या या मुलांना प्रत्यक्ष मॉलमध्ये जाऊन हवी ती शॉपिंग करण्याची संधी नंद गोपाल वर्मा यांनी दिली.
आणखी वाचा : या चुकीमुळे पोलिसाने आकारला पोलिसालाच दंड; Viral फोटो ठरतोय चर्चेचा विषय
नंद गोपाल वर्मा यांनी केलेल्या या मदतीमुळे शेकडो मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आणि इतरांप्रमाणे त्यांचीही दिवाळी आनंदी झाली. नेटकऱ्यांकडुन नंद गोपाल वर्मा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, समाजातील अशा गरजू व्यक्तींसाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन मदत केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.