उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथांकडे युपीची जनता मोठ्या अपेक्षेने पाहू लागली आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे जनतेला स्वप्न दाखवणारे भाजपचे सरकार आपल्याला नक्कीच मदत करतील अशा अपेक्षेने ११ वर्षांच्या मुलाने योगींच्या दरबारी धाव घेतली आहे. आधीच्या सरकारकडे मदतीसाठी त्याने अनेकदा विनवण्या केल्या, सरकारी कचे-यात जा- ये करण्यात चप्पला झिजवल्या पण मदत काही मिळाली नाही, तेव्हा नवे मुख्यमंत्री तरी मदत करेल अशी अपेक्षा त्याला आहे.
वाचा : कत्तलखाने बंद केल्यामुळे चहा विकण्याची वेळ
लखनऊमध्ये राहणा-या हर्षची आई लहानपणीच वारली, तर वडिल तुरुंगात आहेत. त्यांच्यावर खोटा खटला चालवून तुरुंगात डांबण्यात आले आहे असा त्याचा आरोप आहे. गेल्या दीड वर्षांपासून ते जेलमध्ये आहेत तेव्हा आपल्याला मदत करावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. हर्ष सध्या आपल्या आत्याकडे राहतो. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी तो प्रयत्न करत आहे पण त्याला अपेक्षित मदत काही मिळाली नाही तेव्हा दीड वर्षांच्या प्रयत्नानंतर तो योगींच्या दरबारी आला आहे. वाराणसी येथे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली तक्रार ऐकवली आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे आहे. तेव्हा मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणारे योगी आदित्यनाथ आता या मुलाची मदत करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.