Man Travels On Roof Of Train : ट्रेनच्या छतावरून प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे, तरीही काही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसतात. अशाचप्रकारे उत्तर प्रदेशातील एका ३० वर्षीय तरुणाने ट्रेनमध्ये जागा न मिळाल्याने हमसफर एक्स्प्रेसच्या छतावरून झोपून चक्क प्रवास केला. १०० किमी/तास वेगाने धावणाऱ्या या ट्रेनच्या छतावर झोपून तरुणाने दिल्ली ते कानपूर असा प्रवास केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे तो तरुण जिथे झोपला होता, तिथून ५ फूट वर ११,००० व्होल्ट पॉवर लाइन जात होत्या, परंतु कोणतीही हालचाल न केल्याने तरुण पॉवर लाइन संपर्कात आला नाही, त्यामुळे सुदैवाने तो थोडक्यात बचावला.
जेव्हा हमसफर एक्स्प्रेस ट्रेन कानपूर रेल्वेस्थानकावर पोहोचली, तेव्हा तेथील रेल्वे पोलिसांना (GRP) हा तरुण ट्रेनच्या छतावर झोपलला दिसला. यानंतर तात्काळ हाय टेन्शन लाइन बंद करून तरुणाला जबरदस्तीने खाली उतरवण्यात आले. तरुणाचा हा विचित्रपणा पाहून अधिकारीदेखील अवाक् झाले. यानंतर २० मिनिटांच्या विलंबाने ट्रेन पुढच्या प्रवासासाठी निघाली.
दिलीप कुमार असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, सुरुवातीला अधिकाऱ्यांना तरुणाचा मृत्यू झाला असे वाटले आणि त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी झाले. नंतर रेल्वे पोलिस दल (RPF) अधिकारी ट्रेनच्या छतावर चढले आणि स्टेशन परिसराच्या सभोवतालच्या ओव्हरहेड पॉवर लाईन्स कापून तरुणाला खाली आणले. यानंतर जीआरपी आणि रेल्वे पोलिस दलाने (आरपीएफ) तरुणाविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १५६ अन्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्यानंतर त्याला प्रयागराजमध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, जिथे त्याला दंड ठोठावण्यात आला आणि त्याची सुटका करण्यात आली.
कानपूरचे आरपीएफ स्टेशन प्रभारी बी. पी. सिंह यांनी सांगितले की, त्या व्यक्तीने ट्रेनच्या डब्याच्या छतावर झोपून दिल्ली ते कानपूर प्रवास केला. तो मध्येच कुठेतरी उभा राहिला असता तर तो विजेच्या तारांच्या संपर्कात आला असता आणि त्याला जीव गमवावा लागला असता.
चौकशीदरम्यान दिलीप कुमारने खुलासा केला की, ट्रेनमध्ये सीट उपलब्ध नसल्याने त्याने ट्रेनच्या छतावर चढून प्रवास करण्याचा निर्णय घेतला, यात प्रवासादरम्यान थंडगार वारे वाहत होते. अशाने मला चांगली झोप लागली.
जर एखादा प्रवासी किंवा इतर कोणतीही व्यक्ती ट्रेनच्या छतावर, पायऱ्यांवर, इंजिनवर किंवा ट्रेनच्या इतर कोणत्याही भागात बसून प्रवास करत असल्यास त्या प्रवाशाला तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा पाचशे रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.