तुरुंगातील कैद्यांमध्ये परिवर्तन व्हावं तसंच त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी कारागृहामध्ये मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. त्यामध्ये खेळांचाही समावेश असतो. पण कैद्यांसाठी ‘आयपीएल’प्रमाणे एखादी भली माठी स्पर्धा आयोजित केल्याचं तुम्ही पाहिलं नसेल. मात्र, उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये कैद्यासाठी मागील पाच वर्षापासून लीग सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मेरठला खेळाचे शहर का म्हटलं जातं याचा प्रत्यय सर्वांना आला आहे.
आयपीएल म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर प्रेक्षकांचा जल्लोष उभा राहतो. पण कोणते तरी गुन्हेगारी कृत्य करुन तुरुंगामध्ये सजा भोगणाऱ्या कैद्यांना आयपीएलचा आनंद घेता येत नाही. शिवाय रोज रोज चार भितींच्या आत राहून त्यांचे मानसिक संतुलन बिघडते तर कैद्यांना देखील थोड मनोरंजन व्हावं, यासाठी आता मेरठ जिल्हा कारागृहात जेल प्रीमियर लीगचे आयोजन केलं असून कारागृहातील कैदी क्रिकेट सामन्याचा आनंद घेत आहेत.
आणखी वाचा- ऑरेंजच स्पेलिंग ‘ORIG’ तर कार्यालयाचं ‘कार्यलल’; स्वत:चे नावही लिहता न येणाऱ्या शिक्षकाचा भांडाफोट
त्यामुळे मेरठ जिल्हा कारागृह खेळाचं मैदान बनलं असून तुरुंगाती कैदी एकतर क्रिकेट मॅच खेळतात किंवा मॅचची चर्चा करताना दिसत आहेत. आयपीएलच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेल्या या ‘जेल प्रीमियर लीग’ मागील ५ वर्षांपासून आयोजित केली जात असून या लीगमुळे कैद्यांमध्ये खेळाची भावना जागृत होते आणि त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास देखील मदत होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक राकेश कुमार यांनी दिली.
सात संघ सहभागी –
मेरठमधील चौधरी चरण सिंग जिल्हा कारागृहात आयोजित केलेल्या या ‘जेल प्रीमियर लीग’मध्ये एकूण ७ संघ सहभागी झाले आहेत. तर प्रत्येक संघात पंधरा खेळाडू असून त्यांचे एकूण ४७ सामने खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा केवळ कैद्यांसाठी आयोजित करण्यात आली असून स्पर्धेत तुरुंगातील पोलिस कर्मचाऱ्यांसह इतर सहकारी कर्मचारी सहभागी होणार नाहीत. कैद्यांचा हा अनोखा सामना पाहून मेरठ झोनचे एडीजी यांनी या तुरुंग प्रशासनाच्या उपक्रमाचे कौतुक केलं आहे.
दरम्यान, कारागृहात कवी संमेलन, भागवत कथा अशा कार्यक्रमांचे देखील आयोजन केलं जात. तर या कार्यक्रमांचा उद्देश हा कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी एवढाच आहे. कारागृहाला सुधारगृह म्हटले जाते. अशा घटनांमधून कैद्यांच्या वर्तणुकीत बदल घडवून आणला तर नक्कीच समाजाचे भले होईल असंही राकेश कुमार यांनी सांगितलं.