शहरातील अनेक वस्त्यांमध्ये माकडांचा वावर असणं ही सामान्य बाब आहे. शहरातील माकडं ही जंगलातील माकडांप्रमाणे सहसा नागरिकांवरती हल्ला करत नाहीत, त्यामुळे लोकं देखील या माकडांना पाहून घाबरत नाहीत आणि बिनधास्तपणे आपली दैनंदिन कामं पार पाडतात.
मात्र, माकडांचा मूड कधी बदलेल आणि ते आपल्यावर हल्ला करतील हे सांगता येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाय वस्तीमधील माकडं ही कधीच हल्ला करणार नाहीत याची हमी देखील देता येत नाही. त्यामुळे आपण या माकडांपासून स्वत:ची काळजी घ्यायला हवी आणि जर ती घेतली नाही तर जीव देखील गमवावा लागू शकतो. कारण माकडाने केलेल्या हल्ल्यापासून बचाव करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे.

आणखी वाचा- बिबट्याच्या एका फोटोसाठी फोटोग्राफरचा बर्फातून १६५ किलोमीटर पायी प्रवास; जाणून घ्या, Viral Photo मागची गोष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजाबादमध्ये बांगडीचा व्यापार करणारे आशिष जैन (४०) हे काल मंगळवारी आपल्या राहत्या घराच्या गच्चीवरती फेरफटका मारण्यासाठी गेले असता, अचानक माकडांच्या टोळीने त्यांच्यावरती हल्ला केला. आशिष यांनी स्वत:ला माकडांपासून वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला पण माकडांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने आपला बचाव होणं शक्य नसल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांच्या गच्चीवर उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्देवाने त्यांचा पाय घसरला आणि हात सुटल्यामुळे ते डोक्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

आणखी वाचा- मांजरीला कधी Nagin Dance करताना पाहिलय का? हा Viral Video पाहून नेटकरीही झाले फिदा

दरम्यान, आशिष हे गच्चीवरुन खाली पडल्याची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यासाठी नेलं, तेथील डॉक्टरांनी त्यांना आग्रा येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र, आग्रा येथील रुग्णालयात त्यांना मृत घोषीत केलं. आशिष यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. तर प्रशासने तेथील माकडांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या माकडांमुळे याआधीही अनेक नागरिकांना इजा झाली असूनही माकडांचा बदोबस्त करण्यात येत नसल्याचंही स्थानिकांनी सांगितलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh news a mans death in monkeys attack in firozabad jap