उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका हतबल पित्याने गंभीर आजारी असलेल्या आपल्या मुलाच्या उपचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावनिक पत्र पाठवले आहे. राजू असे त्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा गंभीर आजाराने पीडित आहे. पण मोलमजुरी करून कुटुंबाचे पोट भरणाऱ्या या पित्याला आता त्याच्या उपचारांचा खर्च झेपत नाही. आपल्या मुलावर उपचार करा, अन्यथा त्याला इच्छामरण देण्याची परवानगी द्या, असे भावनिक पत्र त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले आहे.
राजू मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरत आहेत. त्यांचा मुलगा विपीन एनिमिया या गंभीर आजाराने त्रस्त आहे. हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशींची कमतरता असल्याने त्याची प्रकृती नाजूक आहे. त्याच्या उपचारावर येणारा खर्च मोलमजुरी करणाऱ्या या पित्याला परवडत नाही. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी या पित्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत त्याच्या उपचारावर खूप पैसे खर्च केले आहेत. पण आता हा पिता परिस्थितीसमोर हतबल झाला आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी या पित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पत्र पाठवले आहे. माझ्या मुलावर उपचार करा. जर त्याच्यावर उपचार करू शकत नाहीत, तर त्याला इच्छामरणाची परवानगी दिली जावी, अशी मागणी त्याने या पत्राद्वारे केली आहे.
राजू यांनी आपल्या मुलाच्या उपचारासाठी आधीच खूप पैसे खर्च केले आहेत. त्यांच्याकडील पैसा मुलाच्या उपचारांसाठी खर्च केला आहे. त्याचे कुटुंब कर्जबाजारी झाले आहे. विपिनच्या आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांनी अनेक रुग्णांलयांमध्ये त्याला उपचारासाठी दाखल केले. पण त्याने आजार बरा होऊ शकलेला नाही. विपिनवर आता या आजारासंबंधी एक महत्त्वाची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची आहे. पण त्यासाठी लाखो रुपयांची गरज आहे. पण कर्जबाजारी झालेल्या राजू यांना हा खर्च परवडणारा नाही. गेल्या दीड वर्षांपासून या आजाराने त्रस्त आहे. दर पंधरा दिवसाला शरिरातील रक्त बदलावे लागत आहे, अशी माहिती विपिनने दिली.