देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ बनवला, ज्यामध्ये त्याने एक महिला आणि तिच्या साथीदारांच्या धमक्यांना, त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले आहे.
पम्मी असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून तो पालिका कार्यालयात ईव्हीएम स्टोअरच्या सुरक्षेचे काम करत होता. आत्महत्येपूर्वी पम्मीने तीन मिनिटांचा व्हिडीओही रेकॉर्ड केला असून, त्यात त्याने आत्महत्येचे कारण सांगितले आहे.पम्मी हा मूळचा औरंगाबादमधील बुलंदशहर येथील अहिर गावातील आहे.
पम्मीला दोन वर्षांपासून केले जात होते ब्लॅकमेल
आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या या व्हिडीओमध्ये पोलिस कॉन्स्टेबलने सांगितले की, तो दोन वर्षांपासून एका महिलेच्या ब्लॅकमेलिंगची शिकार होत आहे आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
या व्हिडीओमध्ये त्याने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तो एका महिलेच्या संपर्कात आला होता. मात्र, काही कारणावरून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला, पण काही दिवसांनी त्या महिलेने तिच्या दोन साथीदारांच्या मदतीने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, गेल्या दोन वर्षांपासून ती महिला पोलिस कॉन्स्टेबलला ब्लॅकमेल करत होती. यादरम्यान महिलेने पोलिस कॉन्स्टेबल पम्मीवर पैसे देण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. यावेळी पम्मीने घाबरुन त्याला सहा लाख रुपयेही दिले. मात्र, तरीही महिलेसह तिचे साथीदार पैशांची मागणी करत राहिले.
यावेळी पम्मीला त्या महिलेसह तिच्या साथीदारांनी खोट्या एफआयआरमध्ये अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.
पत्नीचे दागिने विकून पैसे दिले
पम्मीने व्हिडीओमध्ये पुढे सांगितले की, त्याला दोन वर्षांपासून ब्लॅकमेल करणारी महिला तिच्या परिसरात राहणारी आहे आणि त्याच गावातील आणखी दोघांना घेऊन तिने पम्मीला अडकवले होते. या दरम्यान पम्मीने त्याच्या पत्नीचे दागिने विकून त्या लोकांना पैसे दिले होते, मात्र त्यांची मागणी वाढत होती. शेवटी वैतागून पम्मीने आत्महत्या केली.
कॉन्स्टेबलने या आत्महत्येला ती महिला आणि तिचे साथीदार जबाबदार असल्याचे व्हिडीओत सांगितले आहे . व्हिडीओ बनवल्यानंतर पम्मीने रात्री ८.३० वाजता सरकारी रायफलने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
© IE Online Media Services (P) Ltd