मागील महिन्यात मुसळधार पावसामुळे अनेक राज्यात जनजीवन विस्कळीत झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता ऑगस्ट महिन्यातही उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार घातला आहे. येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ६० जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे. तर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे. याच मुसळधार पावसामुळे डेहराडून येथील डिफेन्स कॉलेजची इमारत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, मुसळधार पावसामुळे डिफेन्स कॉलेजची इमारत अक्षरशः पत्त्याप्रमाणे नदीत कोसळली आहे. कॉलेजची इमारत नदीच्या जोरदार प्रवाहामुळे कोसळल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय इमारतीचा काही भाग पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. इमारत कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचा लोट पसरले आहेत.
व्हिडीओ पाहा –
१६ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा –
दरम्यान, हवामान खात्याने डेहराडून आणि नैनितालसह उत्तराखंडमधील सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर उत्तराखंडमध्ये १६ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हरिद्वार जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. डेहराडूनमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. शिवाय हिमाचल आणि उत्तराखंडमधील शेकडो रस्ते भूस्खलनामुळे ठप्प झाले आहेत. उत्तर प्रदेशातील ऋषिकेश ते मुरादाबाद आणि उत्तर-पूर्व राज्य आसाममध्येही संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.