Chardham Yatra 2024: उत्तराखंडमधील चारधाम यात्रा सुरू होऊन चार दिवस उलटले आहेत. या यात्रेत दर्शनासाठी लाखो भाविक येत आहेत. या यात्रेचे चारही धाम म्हणजेच चार मंदिरे यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथचे द्वार. देशासह जगभरातील भाविक या ठिकाणांवर मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. अशातच उत्तराखंडमधून तरुणांचा एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात केदारनाथ यात्रेला गेलेले काही तरुण भररस्त्यात खुलेआमपणे पार्टी करताना दिसले. यानंतर पोलिसांनी त्यांना पकडले असून दंड ठोठावला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
केदारनाथच्या वाटेवर सोनप्रयागजवळ काही तरुण त्यांच्या थार गाडीवर बसून पार्टी करताना दिसले. गाडीच्या वर बसून हे तरुण भररस्त्यात दारू पित होते. हा सर्व प्रकार रस्त्याच्या मधोमध घडत होता, जे पाहून भाविक तीव्र संताप व्यक्त करत होते. यानंतर उत्तराखंड पोलिसांचे वाहन तेथे आले आणि त्यांनी या सर्व तरुणांना पकडले. यानंतर त्यांच्याकडून दंड वसूल केला.
या संपूर्ण घटनेबाबत उत्तराखंड पोलिसांनी व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, थारच्या छतावर बसून काही तरुण दारू पित आहेत, त्यानंतर एक व्यक्ती तिथे येते आणि कुठून आलात असे विचारते, तेव्हा हे तरुण गाझियाबादहून आलो असे उत्तर देतात. यावर ती व्यक्ती त्यांना पुढे विचारते की, तुम्ही इथे हे सर्व करायला आणि दारू प्यायला आले आहेत का? हा काय प्रकार आहे? यावर ते तरुण म्हणतात की, आम्ही कुठे गैरवर्तन करत आहोत.
यानंतर, या व्हिडीओमध्ये दुसरी एक क्लिप सुरू होते, ज्यात हे सर्व तरुण जमिनीवर बसून माफी मागताना दिसत आहेत. पुन्हा अशी चूक करणार नाही, असे पोलिसांना म्हणत हे पाचही तरुण हात जोडून माफी मागताना दिसत आहेत.
केदारनाथ धाम यात्रा २०२४ सुरळीत पार पाडण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी ऑपरेशन ‘मर्यादा’ सुरू केले आहे. या कारवाईअंतर्गत बेशिस्त वर्तन करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत आहेत. यावर गुप्तकाशीच्या डीएसपी हर्षवर्धिनी सुमन यांनी सांगितले की, ऑपरेशन ‘मर्यादा’ अंतर्गत आम्ही कोणत्याही प्रकारची नशा करणाऱ्यांवर कडक कारवाई करत आहोत. हे मंदिर आणि देवस्थानांसाठी चांगले नाहीत. आम्ही पर्यटकांना चांगले वागण्याचे आवाहन करतोय.
चारधाम यात्रेत आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत. केदारनाथबद्दल सांगायचे तर अवघ्या ४ दिवसांत १ लाख भाविकांनी बाबांच्या दरबाराचे दर्शन घेतले. जिथे भाविकांच्या गर्दीमुळे संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. दुसरीकडे भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे.