Uttarkashi Tunnel Rescue: ती तारीख होती १२ नोव्हेंबर २०२३, वेळ होती पहाटे साडेपाच वाजण्याची. उत्तराखंडामधील उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात अचानक वरचा भाग कोसळला आणि ४१ कामगार मृत्यूच्या दारात अडकले. पण मंगळवारी रात्री अथक प्रयत्न आणि अनेक आव्हानांना तोंड देऊन एनडीआरएफ, एसडीआरएफसह अनेक परदेशी यंत्रणांनी अखेर ४१ कामगारांना बाहेर काढलं. १७ दिवसांपासून या क्षणाकडे अनेकांचे डोळे लागले होते. दरम्यान बचावलेल्या ४१ कामगारांमधील एका कामगारानं १७ दिवस नेमकं आतमध्ये काय घडलं? ते काय करत होते?, त्यांचा संपूर्ण दिवस कसा जायचा याचा अनुभव सांगितला आहे.
कामगाराने सांगितला ‘तो’ अनुभव
झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय चमरा उरांव या कामगारानं १७ दिवसांचा त्याचा अनुभव सांगितला आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना उरांव यानं सांगितलं की, “सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण आणि मानसीक तणावात गेले. मात्र नंतर आमचा बाहेरच्या रेस्क्यू टीमसोबत संपर्क होताच आम्हाला आता आम्ही यातून बाहेर पडू असा विश्वास वाटला. जेव्हा पहिल्यांदा आमच्यासाठी जेवण आलं त्यावेळी पहिला घास खाल्ला आणि वाटलं देवच आपल्यासाठी धावून आला. रेस्क्यू टीमनं आमचा ताण कमी करण्यासाठी आम्हाला मोबाईल फोन आणि बोर्ड गेम्स दिले. यानंतर आम्ही सर्व कामगार मोबाईलवर लुडोही खेळायचो.”
बोगद्यात अडकलेल्या मजूरांना तणावमुक्त ठेवण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी प्रशासनाने अनेक प्रयत्न केले. मजुरांना वेळ घालवण्यासाठी आणि त्यांना गुंतवण्यासाठी लुडो, पत्ते आणि बुद्धिबळ आदी खेळ बोगद्यात पाठवण्यात आले होते. मजुरांना तणावमुक्त ठेवण्यासाठी त्यांना योगासने करण्याचा सल्ला देण्यात आला होता. सरकारने मजूरांकडे मोबाईल फोनही पाठवले होते, जेणेकरून हे आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहू शकतील. शनिवारी, २६ नोव्हेंबर रोजी मजुरांना गेम खेळण्यासाठी मोबाईल फोनही देण्यात आले.
हेही वाचा >> VIDEO : १७ दिवस बोगद्यात, बाहेर आल्यानंतर मजूर म्हणाला, “ढिगारा कोसळल्यानंतर १० ते १५…
अखेर मृत्यू हरला जिद्द जिंकली
“तसंच आम्ही यादरम्यान आतमध्ये ताज्या हवेचा अनुभवही घेतला. बोगद्यामध्ये झिरपत असणाऱ्या पाण्याखाली आम्ही अंघोळही करायचो. आमचा देवावर विश्वास होता, त्यामुळे आम्हाला शक्ती मिळाली, आणि आमची अखेर सुटकाही झाली.” शेवटी कामगार चमरा उरांव यानं सर्व कामगारांना वाचवणाऱ्या बचावकर्त्यांना आणि प्रार्थना करणाऱ्या देशवासियांचे आभार मानले.