एक ‘पोशिंदा’… दुसरा ‘देव’. पहिला जगण्यासाठी भाकरी देतो. तर दुसरा उपचार. ज्या व्यवसायात ही लोकं काम करतात आज दोघांचा दिवस. ‘कृषिदिन’ आणि ‘डॉक्टर डे’ त्यानिमित्ताने एका स्वाभिमानी शेतकऱ्याच्या मदतीला धावलेल्या संवेदनशील मनाच्या डॉक्टरची गोष्ट. फेसबुक या समाजमध्यमातून ती समाजापुढे आली. आणि समाजमनात ती खोलवर रुतून बसली. शेतकऱ्याच्या स्वाभिमानाला आणि डॉक्टरच्या संवेदनशिलतेला शहर, ग्रामीण सगळ्या सीमा तोडत सर्व स्थरातून नागरिकांनी भरभरून दाद दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील डॉ. अमोल अन्नदाते यांच्या रुग्णालयात माय-बापाचं तापाने फणफणलेलं पोर घेऊन आज्जी आजोबा आले. मुलगा आणि सुनेच्या चितेला अग्नी देऊन काहीच दिवस लोटले होते. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळल्यावर जगण्याचा आधारवड असलेल्या त्या मुलाला आजारपण आलं. नातवासाठी आजोबांची घालमेल सुरु होती. त्या कठीण प्रसंगात डॉक्टरांकडून मायेचा हात मिळाला. मुलाने गळफास घेतल्यानंतरही डोळ्यात पाणी येऊ न दिलेला तो कणखर शेतकरी बाप, आजोबा ढसाढसा रडला. त्यानंतर त्याने जपलेला स्वाभिमानी बाणा आणि डॉक्टरांनी रुग्ण, शेतकरी यांना दिलेला दिलासा याविषयीची संवेदनशील घटना फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर चांगलीच गाजली. डॉ अमोल अन्नदाते यांनी आपल्या भावनांना व्यक्त करुन दिलेली वाट अनेकांना निश्चितच प्रेरणादायी ठरु शकत.
अनाथ मुलाच्या आजोबांची गोष्ट वाचून अनेकांनी आपल्या भावना तर व्यक्त केल्याच त्याशिवाय या शेतकऱ्याला मदत करण्याची इच्छाही व्यक्त केली. इथं फक्त माणुसकी बोलत होती. शहरी लोकांना शेतकरी प्रश्नांची जाण नसते. शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना कळत नाही. असा सारा समज त्यामुळे गळून पडला. आतापर्यंत २५ लाख रुपयांची मदत अनेकांनी देऊ केली आहे. तर काही जणांनी मुलाला दत्तक घेण्याची इच्छा देखील व्यक्त केली. सोशल मीडियाच्या मोजमापात आतापर्यंत ९७ लाख लोकांनी स्वाभिमानी शेतकरी आणि संवेदनशील मनाच्या डॉक्टरांची ती गोष्ट वाचली असून ६६०० जणांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे तर ६ हजारहून अधिक जणांनी ती गोष्ट शेअर केली आहे.