प्रवाशांना कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता यावे यासाठी भारतीय रेल्वेने आपल्या ताफ्यात आधुनिक ‘वंदे भारत’ ट्रेन दाखल केल्या आहेत. भारताच्या जवळपास प्रत्येक भागात रेल्वेचे जाळे आहे; ज्याच्या मदतीने लोक सहजतेने विविध ठिकाणी प्रवास करू शकतात. पण अनेकदा असे दिसून येते की, प्रवासी रेल्वे सेवांचा गैरवापर करताना दिसतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये ‘वंदे भारत’ ट्रेनमध्ये आरक्षण करून प्रवास करणारा एका प्रवासी केवळ सीटच नाही, तर आजूबाजूची जागाही आपल्या मालकीची असल्याप्रमाणे वागत होता.
याबाबतचा चेन्नई वंदे भारत ट्रेनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत एक व्यक्ती सीटच्या समोरच्या फूड ट्रेवर पाय ठेवून झोपलेली दिसत आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना दिले जाणारे खाद्यपदार्थ खाण्यासाठी या ट्रेचा वापर केला जातो; पण तो प्रवासी या ट्रेचा आपली वैयक्तिक मालमत्ता असल्याप्रमाणे गैरवापर करीत आहे.
दरम्यान, हा फोटो आता ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर लोकांनी मोठ्या संख्येने प्रतिक्रिया व्यक्त केल्या. इतकेच नाही, तर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही टॅग करण्यात आला आहे.
भारतीय रेल्वेचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अनंत रूपनागुडी यांनी या फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्व प्रवाशांना आवाहन केले, ”कृपया फिटिंग्ज ज्या उद्देशाने बनवल्या आहेत, त्यासाठीच त्यांचा वापर करा. त्या तुमच्याच पैशांनी तुमच्यासाठी बनवल्या जातात म्हणून तुमच्याकडून त्या फिटिंग्सचे काही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या; अन्यथा त्यासाठी जबाबदार असाल. वंदे भारत ट्रेन्स मोठ्या खर्चात बांधल्या गेल्या आहेत. कृपया जबाबदारीने प्रवास करा.”
सोशल मीडियावरील एका वेगळ्या थ्रेड रूपनगुडी यांनी सांगितले की, या गाड्या तयार करणाऱ्या वंदे भारत ट्रेन्स युनिटमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना प्रवाशांकडून मिळणारा अभिप्राय त्यांच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. या प्लॅटफॉर्मवर इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर, मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितले आहे की, आम्ही आणखी बरेच काही करू शकतो. लोक स्नॅक ट्रे, कुठेतरी लूज फिटिंग्ज, हार्ड सीट, खराब फिनिशिंग आणि कारागिरीचे क्लोज-अप फोटो पोस्ट करतात. अर्थात, आयसीएफकडून अभिप्राय गांभीर्याने घेतले जातात आणि वेळेची मर्यादा असूनही कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक युनिटमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो.