वंदे भारत एक्स्प्रेसची सध्या सर्वात जास्त चर्चा सुरू आहे. या गाडीला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय. ‘वंदे भारत’ मध्ये प्रवाशांना बऱ्याच सुविधा मिळत असून त्यांच्या वेळेतही बचत होत आहे. वंदे भारत रेल्वेचे अनेकांना आकर्षण आहेत. ही रेल्वे पाहण्यासाठी अनेकजण येत असतात. अगदी विमानात मिळणाऱ्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत. अन् कमी वेळेत अंतर गाठता येते. मात्र याच रेल्वेच्या कोचला गळती लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काँग्रेसच्या केरळच्या @congress kerala नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा एक जुना व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, हा व्हिडिओ वंदे भारत एक्सप्रेसचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ सुमारे ८ सेकंदांचा आहे. हा व्हिडीओ कोणत्या ट्रेनचा आणि कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून काँग्रेस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असले तरी हा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांचे लोक हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. देशात वंदे भारत गाड्यांची संख्या सातत्याने वाढवली जात आहे तर दुसरीकडे, ओडिशामध्ये नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघातानंतर, रेल्वे सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ
काँग्रेस केरळच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पावसादरम्यान ट्रेनच्या छतावरून पाणी पडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहेत. ‘आता वंदे भारत ट्रेनने प्रवास करायचा असेल तर अंघोळ करण्याची गरज नाही, ये है नया इंडिया’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या असून मोदी सरकारला टोमणे दिले आहेत.