Vande Bharat Loco Pilot Fight Video : ट्रेनमध्ये विविध कारणांवरून प्रवाशांमध्ये झालेल्या भांडण, मारामारीच्या घटनांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच. प्रवासी कधी सीटवरून, तर कधी जरासा धक्का लागला तरी एकमेकांना शिवीगाळ करीत आपापसांत मारामारी सुरू करतात. विशेषत: महिलांच्या डब्यामध्ये महिला एकमेकांच केेस ओढत एकमेकींना चप्पलने मारत असल्याच्या घटनाही आपण यापूर्वी पाहिल्या असतील. पण आतापर्यंत तुम्ही कधी ट्रेन चालविण्यावरून लोको पायलटना एकमेकांशी भांडताना पाहिले आहे का? ऐकून आश्चर्य वाटेल; पण प्रत्यक्षात ही घटना घडली आहे. राजस्थानच्या उदयपूर ते आग्रा यादरम्यान जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्यासाठी चक्क दोन लोको पायलट एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले. यावेळी त्यांनी एकमेकांचे कपडेदेखील फाडले. हे भांडण इतके वाढले की, दोन्ही लोको पायलटसह इतर चालक आणि गार्ड लोकांनीही त्या भांडणात हात साफ करून घेतले. भर रेल्वेस्थानकात हा सर्व प्रकार सुरू होता; ज्याचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वंदे भारत ट्रेन चालण्यावरुन लोको पायलटमध्ये झाली भांडणं

हा व्हिडीओ आग्रा ते उदयपूरदरम्यान सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या व्हिडीओत दिसतेय की, ट्रेन चालविणाऱ्या लोको पायलटचा समूह ‘वंदे भारत’च्या केबिनमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहे. अनेक जण केबिनच्या दरवावर असलेल्या छोट्या खिडकीतून आत जाण्याचाही प्रयत्न करीत आहेत. त्यानंतर ट्रेनचा दरवाजा उघडताच लोको पायलट शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे आत शिरण्यासाठी एकमेकांना ढकलताना दिसत आहेत. ट्रेनच्या सर्वसाधारण डब्यात घुसून सीट पकडण्यासाठी प्रवाशांची जशी चढाओढ सुरू असते, तसेच काहीसे हे दृश्य बघून वाटत होते. इतक्या मोठ्या संख्येने लोको पायलट केबिनमध्ये घुसल्याने तिथे तुफान गर्दी झाली होती.

Read More News : नेलकटरमध्ये अतिरिक्त दोन ब्लेड का असतात? त्यांचा उपयोग नेमका कशासाठी केला जातो? घ्या जाणून….

यावेळी वंदे भारत एक्स्प्रेस कोण चालवणार यावरून केबिनमध्ये चढलेल्या दोन लोको पायलटमध्ये भांडण सुरू झाले. या भांडणाचे रूपांतर काही वेळाने हाणामारीत झाले; ज्यात वंदे भारत एक्स्प्रेसच्या गार्ड रूमच्या दरवाजाचे लॉकसह काचाही फोडण्यात आल्या. इतकेच नव्हे, तर लोको पायलटनी एकमेकांचे कपडेदेखील फाडले. अखेर या प्रकरणात पोलिसांनी मध्यस्थी केली आणि लोको पायलटना थांबवण्याचा प्रयत्न केला. आता हे प्रकरण रेल्वे बोर्डापर्यंत गेले असून, ज्यावर अद्याप कोणता तोडगा निघालेला नाही; मात्र या भांडणामुळे उदयपूर ते आग्रा आणि आग्रा ते उदयपूर या प्रवासाला मोठा विलंब झाला.

व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्यावर भरपूर कमेंट्स करून मजा घेत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, प्रत्येकाला अर्धा तास एक-एक करून ट्रेन चालवायला मिळेल. दुसऱ्याने लिहिले की, मी पहिल्यांदाच सरकारी कर्मचाऱ्यांना आपले काम करण्यासाठी एकमेकांशी भांडताना पाहिले आहे. आणखी एका युजरने लिहिले की, पश्चिम-मध्य रेल्वे, उत्तर-पश्चिम, उत्तर रेल्वेने आपापल्या कर्मचाऱ्यांना गाड्या चालविण्याचे आदेश दिले आहेत. तिन्ही विभागांतील कर्मचारी दररोज एकमेकांशी भिडत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांना फक्त चांगल्या प्रकारे ट्रेन चालवल्याने वेतनवाढ वा बढती मिळते. त्यामुळे ‘मी ट्रेन चालवणार, नाही मी चालवणार’ अशी अहमहमिका रोजच दिसत आहे.