Vande Bharat Passenger Finds Dead Cockroach In Meal : जलद रेल्वे प्रवासासाठी देशातील अत्याधुनिक ‘वंदे भारत’ ट्रेनला प्रवाशांची पसंती मिळत आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना एक्स्प्रेसच्या तुलनेत खूप दर्जेदार सुविधा दिल्या जातात. त्याशिवाय ट्रेनमध्येच जेवणाची सुविधा असल्याने प्रवाशांना रेल्वेस्थानकावरून काही खरेदी करून खाण्याची गरज पडत नाही. मात्र, काही दिवसांपासून ‘वंदे भारत’मधील जेवणाच्या निकृष्ट दर्जाबाबत अनेक घटना समोर येत आहेत. अशात पुन्हा एकदा एका प्रवाशाने ‘वंदे भारत’मधील जेवणाबाबत तक्रार केली आहे. या प्रवाशाला शाकाहारी जेवणात चक्क झुरळ आढळून आले. त्यानंतर प्रवाशाने लगेच याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. त्यावर आता रेल्वे प्रशासन ( IRCTC) ने उत्तर दिले आहे. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रवाशाने ट्वीटद्वारे दिली माहिती
एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) @iamdrkeshari नावाच्या युजरने आपल्या अकाउंटवरून एक पोस्ट करीत वंदे भारत ट्रेनच्या जेवणात झुरळ आढळल्याच्या घटनेची माहिती दिली आहे. त्याच्या ट्वीटनुसार हा प्रवासी १ फेब्रुवारी २०२४ रोजी 20173 क्रमांकाच्या वंदे भारत या ट्रेनने रानी कमलपती RKMP ते जबलपूर जंक्शन (JBP) या रेल्वेस्थानकांदरम्यान असा प्रवास करीत होता. दरम्यान, त्याला मिळालेल्या जेवणाच्या पॅकेटमध्ये चक्क झुरळ सापडले. या घटनेनंतर त्याने संताप व्यक्त केला. तसेच आयआरसीटीसी आणि रेल्वेमंत्र्यांना आपले ट्वीट टॅग करून घटनेची माहिती दिली. त्याने आपल्या ट्वीटमध्ये जेवणात आढळलेल्या झुरळाचा फोटोदेखील पोस्ट केला आहे.
७०० रुपयांना थार मागणारा चिमुकला थेट पोहचला कारखान्यात; आनंद महिंद्रांनी Video केला शेअर, म्हणाले…
त्याची ही पोस्ट व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने प्रतिक्रिया देत या प्रकरणी गंभीर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यावर आयआरसीटीसीने उत्तर देत लिहिले की, तुमच्या अनुभवाबद्दल आम्ही खूप दिलगिरी व्यक्त करतो. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, संबंधित सेवा पुरवठादाराला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याशिवाय त्या ठिकाणावरही लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर नेटकऱ्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.