आपल्या मित्रपरिवारामध्ये जर एखादी व्यक्ती शाकाहारी असेल तर मित्रांसोबत बाहेर जेवायला गेल्यावर त्या एका व्यक्तीमुळे आपल्याला दोन पद्धतींचे जेवण मागवायला लागते. अशातच या व्यक्तींना शाकाहारी जेवणामध्ये मांसाहारी जेवणाचा स्वाद घेता आला तर? बहुतेक शाकाहारी लोकांना हे ट्राय करायला नक्कीच आवडेल. सोशल मीडियावरही सध्या शाकाहारी मच्छीचा (Vegetarian Fish Fry) व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचे शाकाहारी मित्र नक्कीच आश्चर्यचकित होतील.
दिल्लीच्या एका फूड स्टॉलवरील विक्रेता बिनदिक्कतपाने शाकाहारी फिश फ्राय विकत आहे. या दुकानदाराने दावा केला आहे की तो खासकरून शाकाहारी खवय्यांसाठी शाकाहारी फिश फ्राय बनवतो आणि तुम्हाला या डिशच्या चवीशी अजिबात तडजोड करावी लागणार नाही.
कशी बनवली जाते शाकाहारी फिश फ्राय डिश ?
फूड ब्लॉगर अमर सिरोही याने या एका व्हिडीओमध्ये शाकाहारी फिश फ्राय बनवणाऱ्या या फूड स्टॉलबद्दल माहिती दिली आहे. या डिशमध्ये सोयाबीन सोबतच आले-लसूण पेस्ट आणि इतर पदार्थांचा वापर केला आहे. सगळे पदार्थ एकजीव केल्यानंतर त्याला माश्यांचा आकार दिला जातो. यानंतर या शाकाहारी मच्छीला कॉनफ्लोरच्या मिश्रणात घोळवाले जाते. त्यावर कॉर्नफ्लेक्स आणि ब्रेडक्रम्स लावून डीप फ्राय केले जाते. तयार झालेला पदार्थ अतिशय सुंदर दिसतो. स्वतः फूड ब्लॉगरसुद्धा याचे कौतुक करताना दिसतोय. दुकानदाराने या मच्छीची किंमत २५० रुपये ठेवली आहे.
foodie_incarnate या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आवडला असून या व्हिडीओला बरेच व्ह्यूज आहेत. शुद्ध शाकाहारी मच्छी बघून काही लोक खुश झाले तर काहींना हा प्रकार अजिबात आवडला नाही. एका वापरकर्त्याने म्हटलंय, ‘याचा आकार बघूनच हे खायचं मन करत नाही.’ तर दुसऱ्याने म्हटलं, ‘एका मच्छीसाठी २५० रुपये ही किंमत फारच जास्त आहे.’ तुम्हाला ही शाकाहारी फिश फ्राय डिश कशी वाटली?