सासू-सुनेचे नाते हा प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनाचा भाग असतो. भारतीय संस्कृतील सासू-सुनेचे नाते अत्यंत संवेदनशील मानले जाते. अनेकदा लग्नानंतर सासू-सुनेमध्ये खटके उडतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. बदलत्या काळानुसार हल्ली सासू-सुनेच्या नात्यामध्येही बदल दिसून येत आहे. त्या एकमेकींना समजून घेताना दिसत आहेत.सासू-सुनेतील वाद हा अनेकदा चर्चेचा विषय. प्रत्येकवेळी सासू-सुनेत वाद असतोच असे नाही. अनेकदा या नात्यात गोडवाही असतो. अगदी आई-मुलीसारखेही त्यांचे नाते असते. असेच उदाहरण समोर आले.
सासूने वाचवले सुनेचे प्राण
मुंबईतील कांदिवली येथे सासूने सुनेची किडनी निकामी झाल्याचे समजताच आजारातून मुक्तता मिळावी म्हणून स्वतःची किडनी दान करून जीवनदान दिले. सासूने सुनेला किडनी दान दिल्याची घटना दुर्मिळ असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. दरम्यान सासूचे यानंतर कुटुंबाने जोरदार स्वागत केले आहे, या स्वागताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमिशा मोता ४३ यांना किडनी विकाराचा, उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यावर त्या उपचार घेत होत्या. मात्र, तीन महिन्यांपूर्वी किडनी बदलावी लागेल, अन्यथा डायलेसिसवर जावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. अमिशा यांच्या घरातील सदस्यांनी किडनी देण्यासाठी चाचपणी सुरु केली. अमिशा यांच्या पतीला वैद्यकीय कारणामुळे किडनी देणे शक्य नव्हते. अमिशा यांच्या आई-वडिलांना सुद्धा ते शक्य नव्हते.
सासू असावी तर अशी!
अखेर सासूबाई प्रभा स्वतःहून पुढे आल्या. त्यांचे वय ७० वर्षे. त्यांना आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी नव्हत्या. तपासणीनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय झाला. १ ऑगस्ट रोजी सासू-सुनेवर विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सासूबाईंची तब्बेत उत्तम असल्यामुळे त्यांना पाच दिवसांनी घरी सोडण्यात आले. तर सून अमिशा यांना दोन दिवसांनी डिस्चार्ज देण्यात येणार आहे. यावेळी कुटुंबानं या सासूबाईंचं जल्लोशात स्वागत केलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – हात दाखवा, गाडी थांबवा’ अशी धावते पुणे मेट्रो? Video पाहून तुम्हीही म्हणाल, “पुणेकर काहीही करु शकतात…
सध्याच्या घडीला राज्यात किडनी या अवयवाची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकवेळा दोन्ही किडन्या निकामी झाल्याने प्रत्यारोपण हा एकाच मार्ग रुग्णासमोर उरतो. किडनी मिळाली नाही तर रुग्णांना कायमस्वरूपी डायलिसिस करावे लागते. त्यामुळे माणसाचे आयुष्य कमी होते. मात्र अशा रुग्णाला किडनी मिळाली की त्याचे आयुष्य वाढू शकतं.