Viral Video of Dog Attack: पाळीव प्राणी हे मालकांचे आवडते असले तरी अनेकदा त्यांची नीट काळजी न घेतल्यास आजूबाजूच्या व्यक्तींना त्यांचा त्रास सहन करावा लागू शकतो. काही वेळा तर हे एखाद्याच्या जीवावर सुद्धा बेतू शकते. असेच काही प्रकार सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अलीकडेच एका लहान मुलाला शेजारच्या पाळीव कुत्र्याने लिफ्टमध्ये चावल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत होता. आता त्यापाठोपाठ दिल्लीमधील आणखी एक घटना समोर येत आहे. एका ११ वर्षाच्या मुलावर त्याच्या घराजवळील पार्कमध्ये खेळत असताना पाळीव पिट बुल प्रजातीच्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलाच्या चेहऱ्यावर जवळपास २०० टाके पडले.
Video: इथे ‘मी’ राजा आहे! ४ सिंह आपल्या बाळांवर हल्ला करताना ‘या’ आईने..लढाईचा थरार पाहाच
घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुत्रा मुलावर हल्ला करताना दिसत आहे. कुत्र्याची मालकीण त्याला घेऊन बाहेर फिरत असताना कुत्र्याने अचानक मुलावर हल्ला केला. यानंतर आजूबाजूच्या व्यक्ती त्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे येतात पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मदत मिळेपर्यंत अगोदरच या भल्या मोठ्या कुत्र्याने चिमुकल्याच्या चेहऱ्याचा चावा घेतलेला असतो. या घटनेनंतर संबंधित मुलाला दवाखाना नेण्यात आले असता त्याला चेहऱ्यावर २०० टाके मारावे लागले आहेत.
या प्रकरणानंतर मुलाच्या आई वडिलांनी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध तक्रार केली असून विना परवाना किंवा नोंदणी न करता प्राणी पाळणाऱ्या कुत्र्याच्या मालकाला ५००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लहान मुले खेळत असताना बेजबाबदारपणे कुत्र्याला मैदानात सोडणे हे गैर असल्याचे म्हणत मुलाच्या पालकांनी संताप व्यक्त केला.