Rocket Exploded Video: जपानी कंपनी स्पेस वनचे पहिल्याच रॉकेटचा प्रक्षेपणाच्या काहीच सेकंदांनी आकाशात स्फोट झाल्याचा व्हिडीओ ऑनलाईन व्हायरल होत आहे. याबरोबरच आता स्पेस वन कंपनीचे रॉकेट लाँच करणारी देशातील पहिली खासगी कंपनी होण्याचे स्वप्न सुद्धा या स्फोटातील रॉकेटप्रमाणे उद्ध्वस्त झाले आहे. स्पेस.कॉमच्या माहितीनुसार, १३ मार्चला पश्चिम जपानमधील वाकायामा प्रीफेक्चरमधील प्रक्षेपण स्थळावर स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता (भारतातील ७.३०) कॅरोस रॉकेटचे प्रक्षेपण झाले होते. टेक ऑफ नंतर काहीच सेकंदात या १८ मीटर लांबीच्या इंधन भरलेल्या रॉकेटचा स्फोट झाला आणि आजूबाजूचा सगळा परिसर आगीच्या धुराने व्यापून गेला होता.
कंपनीचे अध्यक्ष म्हणतात, आम्ही मुद्दामच ..
कंपनीचे अध्यक्ष मासाकाझू टोयोडा यांनी राऊटर्सला दिलेल्या निवेदनात असे सांगितले की, “रॉकेटने आपले ध्येय साध्य करणे कठीण आहे, हे लक्षात येताच आम्ही मुद्दाम स्वतःहून उड्डाण थांबवले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आता हे उड्डाण अयशस्वी होण्याच्या कारणाची तपासणी केली जाईल व पुढील प्रक्षेपणाचे नियोजन याच अभ्यासावर आधारित असेल.” स्पेस वनच्या कॅरोस रॉकेटची रचना पाहिल्यास ते ५५० पौंड (२५० किलोग्रॅम) पर्यंतचा पेलोड पृथ्वीच्या खालच्या कक्षेत वाहून नेण्यास सक्षम आहे.
हे ही वाचा<< असदुद्दीन ओवेसी भाषणात गाऊ लागले शिव तांडव स्तोत्र? ‘त्या’ सभेत नेमकं असं घडलं तरी काय, पाहा Video
स्पेस वन कंपनी कुणाची आहे? त्यांचं काम काय?
दरम्यान, टोकियो-आधारित Space One ची स्थापना २०१८ मध्ये कॅनन इलेक्ट्रॉनिक्स, IHI एरोस्पेस, कॉ. लिमिटेड शिमिझु कॉर्पोरेशन आणि डेव्हलपमेंट बँक ऑफ जपान या प्रमुख भागधारकांनी केली होती. कंपनीने २०२८ च्या आधी दरवर्षी २० पेक्षा जास्त वेळा लॉन्च करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.सध्या झालेले प्रक्षेपण हे १३ मार्चच्या ऐवजी ९ मार्चला जपानच्या वेळेनुसार नियोजित होते परंतु तेव्हा सुरक्षेच्या कारणाने ते रद्द करण्यात आले.