महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ आज साजरा होत आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता. या घटनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र दिन अगदी साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयामध्ये तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनामध्ये ध्वजारोहण केले. अगदी मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. एकीकडे करोनामुळे महाराष्ट्र दिन अगदी साध्या पद्धतीने साजरा केला जात असतानाच ऑनलाइन माध्यमांवरही महाराष्ट्र दिन अगदी उत्साहात साजरा केला जात आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन महाराष्ट्र दिनानिमित्त एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची स्थापना झाली त्यावेळी काय काय घडलं होतं हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. यामध्ये अगदी १ मेच्या मध्यरात्री महाराष्ट्र राज्यच्या निर्मितीची तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी केलेली घोषणा, महाराष्ट्राचा नवा नकाशाची पहिली झलक अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये पाच दिवस कशापद्धतीने नवीन राज्याच्या निर्मितीचा उत्साह साजरा करण्यात आला हे ही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे अनावरण, मुंबईमधील इमारतींना पाच दिवस करण्यात आलेली रोषणाई अशा अनेक घटना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे देशातील प्रमुख धर्माच्या धर्मगुरुंनी मुंबईल क्रॉस मैदानात केलेल्या सामुहिक प्रार्थनांपासून ते कामगारांनी काढलेल्या जल्लोष यात्रा आणि सिंहगडवरील लढाईच्या नाटकापासून ते यशवंतराव चव्हाण यांच्या शपथविधीपर्यंत अनेक घटनांचे चित्रण पहायला मिळत आहे.
1st May 1960
Celebrations of Inception Day of Maharashtra..#महाराष्ट्रमाझा#महाराष्ट्र@६०#Maharashtra@60#हीरकमहोत्सवीमहाराष्ट्र#MaharashtraDay#महाराष्ट्रदिन pic.twitter.com/WILlkZRebg
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) April 30, 2020
संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात १०५ हुतात्म्यांचे बलिदान गेल्याने महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्र दिनाकडे जिव्हाळय़ाने व भावनिकदृष्टय़ा पाहात आली आहे. त्यावेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा निर्णय करून घेण्यात यशवंतराव चव्हाण यशस्वी झाले होते. दिल्लीतील प्रमुख नेत्यांची मान्यता मिळाल्याने १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यावेळच्या ऐतिहासिक कार्यक्रमात यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणून त्याचे पूजन केले होते. अशा या ऐतिहासिक क्षणाचा आज हीरक महोत्सव असूनही महाराष्ट्र दिन म्हणून दरवर्षी दिमाखात साजरा होणारा हा दिवस सध्या करोना विषाणूच्या ग्रहणामुळे अतिशय साधेपणानेच साजरा होताना दिसत आहे.