उत्तर प्रदेशमधील मैनपुरी येथे एक धक्कादायक घटना कॅमेरात कैद झालीय. येथील समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह यादव यांच्या गाडीला एका ट्रकने धडक दिली. धक्कादायक बाब म्हणजे धडक दिल्यानंतरही हा ट्रक थांबला नाही. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या ट्रकने हा कार जवळजवळ ५०० मीटरपर्यंत घसरत स्वत:सोबत नेली. मात्र या अपघातातून देवेंद्र सिंह यादव हे सुखरुप बचावले आहेत. देवेंद्र सिंह यादव यांचं दैव बलवत्तर होतं म्हणून त्यांना साधं खरचटलंही नाही.
नक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत
ट्रकने दवेंद्र यांच्या गाडीला धडक दिली तेव्हा ते गाडीमध्ये एकटेच होते. देवेंद्र हे करहल रोडवरुन आपल्या घराच्या दिशेने जात असताना मैनापुरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील भदावर हाऊस समोर हा विचित्र अपघात घडला. या प्रकरणामध्ये देवेंद्र यांनी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केलीय.
दरम्यान या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये ट्रकच्या समोर आलेल्या लाल रंगाच्या गाडीला ट्रक घसरत नेताना दिसत आहे. या ट्रकच्या आजूबाजूला लोक धावताना दिसत आहेत. या गाडीच्या दुसऱ्या बाजूला एक बाईक अडकली असून ती सुद्धा या कारसोबत फरफटत बराच अंतर गेल्याचं दिसून येत आहे. गाड्यांचा हा अपघात एवढा भीषण आहे की गाडीला फरफटत नेताना घर्षण होऊन आगीच्या ठिणग्या उडताना दिसत आहेत.
ट्रकने गाडीला ५०० मीटरहून अधिक फरफटत नेलं. इटावा येथील हा ट्रक चालक असून त्याला अटक करण्यात आलीय. पुढील तपास आम्ही करत आहोत, अशी माहिती मैनापुरीचे पोलीस निरिक्षक कमलेश दिक्षित यांनी दिली.
पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोंद करुन घेतली असून अधिक तपास करत आहे. दैनपुरी हा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांचं या प्रदेशाकडे विशेष लक्ष असतं. अखिलेश हे सध्या मैनापुरी जिल्ह्यातील करहलच्या मतदरासंघाचे आमदार आहेत. समाजवादी पक्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये या जिल्ह्याने कायमच महत्वाचं योगदान दिलंय.